राज्यात ८ मार्गांवर रो-रो फेरी सेवा सुरू करण्याची योजना

मुख्यमंत्री : चोडण-रायबंदर मार्गावर ‘द्वारका’, ‘गंगोत्री’ फेरींचे लोकार्पण


6 hours ago
राज्यात ८ मार्गांवर रो-रो फेरी सेवा सुरू करण्याची योजना

चोडण-रायबंदर मार्गावरील रो-रो फेरी बोटीचे फीत कापून लोकार्पण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट व इतर. (नारायण पिसुर्लेकर)
....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारने राज्यातील आठ महत्त्वाच्या मार्गांवर रो-रो फेरी सेवा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेसाठी लोकांचे सहकार्य आवश्यक असून, जनतेने या फेरी सेवेसाठी फक्त २५ टक्के शुल्क भरण्यास सहमती दर्शवली, तर सरकार आठही मार्गांवर रो-रो फेरीची सेवा देण्यास तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सरकार केवळ सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनासाठी जेटी बांधत आहे. समाज कार्यकर्त्यांनी विनाकारण गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी रायबंदर फेरी धक्क्यावर ‘द्वारका’ आणि ‘गंगोत्री’ या अत्याधुनिक रो-रो फेरी बोटींचे लोकार्पण केले, त्यावेळी ते बोलत होते. या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि इतर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर दोन्ही रो-रो फेरी रायबंदर-चोडण मार्गावर प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या. प्रत्येक बोटीमध्ये एकाच वेळी १५ कार, ४० स्कूटर आणि १०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. ही फेरी रायबंदर ते चोडण हे अंतर सात ते आठ मिनिटांत पूर्ण करेल. त्यामुळे फेरीसाठी वाट पाहण्याचा आणि त्यात प्रवास करण्याचा वेळ १२ मिनिटांपेक्षा जास्त राहणार नाही. सरकार प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ इच्छिते, त्यामुळे लोकांनी ५ रुपये या भाडे दराला विरोध करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आठ फेरी मार्गांवर या रो-रो सेवा सुरू करण्याचा सरकार विचार करत आहे. परंतु, यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. या योजनेत सरकार ७५ टक्के खर्च करेल, तर जनता २५ टक्के शुल्क भरेल. आम्ही उत्तर आणि दक्षिण गोवा नद्यांच्या द्वारे जोडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
आम्ही जेटी दुरुस्तीचे काम करतो, तेव्हा ते फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी असते. अन्य कोणत्याही कारणासाठी नाही. जे लोक भलतेच काहीतरी डोक्यात घेऊन विरोध करत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, जेटी फक्त स्थानिक आणि पर्यटकांसाठी वापरली जाईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
‘मेक इन गोवा’ला मिळणार चालना !
विजय मरीन सर्व्हिसेसने २५ कोटी रुपये खर्चून या दोन्ही फेऱ्या पीपीपी तत्त्वावर बांधल्या आहेत. विजय मरीन सर्व्हिसेस ही रो-रो फेरीसेवा चालवेल. सरकार त्यांना ४० लाख रुपये भाडे देईल. विशेष म्हणजे, या दोन्ही फेऱ्या गोव्यातील शिपयार्ड आणि गोव्यातील अभियंत्यांनी बांधल्या आहेत. त्यामुळे हा फेरी प्रकल्प पूर्णपणे ‘मेक इन गोवा’ आहे. अन्य राज्ये रो-रो बोटींचे अनुकरण करतील आणि गोव्यात त्या खरेदी करतील, तेव्हा ‘मेक इन गोवा’ उपक्रम संपूर्ण देशात पोहोचेल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.