वारसा घरांच्या जतनासाठी सरकारकडून आर्थिक मदतीची योजना

योजनेचा मसुदा अंतिम टप्प्यात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th July, 12:23 am
वारसा घरांच्या जतनासाठी सरकारकडून आर्थिक मदतीची योजना

पणजी : गोव्यातील सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या वारसा घरांच्या जतनासाठी सरकार लवकरच आर्थिक मदतीची योजना जाहीर करणार आहे. या योजनेचा मसुदा अंतिम टप्प्यात असून लवकरच अंमलात आणला जाईल, अशी माहिती पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
ते म्हणाले, राज्य सरकारने तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार केलेल्या वारसा धोरणात गोव्यातील पारंपरिक वाडे, घरे, वारसा स्थळे व पारंपरिक व्यवसायांची यादी तयार केली आहे. या धोरणाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकार आता आवश्यक कायदेशीर तरतुदी व योजना तयार करत आहे.
१२२ वारसा घरांना लाभ
या धोरणांतर्गत सध्या १२२ वारसा घरांची निवड करण्यात आली आहे. या घरांच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणासाठी सरकार घरमालकांना आर्थिक मदत देणार आहे. या संदर्भात आर्थिक मदतीचे निकष, प्रक्रियेचा आराखडा आणि अटी ठरवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. घरमालकांकडून सूचना मागवून लवकरच अंतिम स्वरूप ठरवले जाणार आहे.
१२२ घरांमध्ये काही उल्लेखनीय वास्तूंचा समावेश आहे: शंकर घाडी घर (वेळगे), प्रशांत धोंड (वेळगे), उसगावकार घर (उसगाव), सोंदेकर राजवाडो (नागेशी), म्हामाई कामत घर (पणजी), वागळो हाऊस (पणजी), शेखर प्रभू (श्रीस्थळ), जीवबादादा केरकर हाऊस (पेडणे), देशप्रभू राजवाडो (पेडणे), आबे फारीया हाऊह (कांदोळी), राणे वाडा (साखळी), कालिदास दुभाशी घर (साखळी) यांचा समावेश आहे.
मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले की, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी विद्यमान कायद्यांचा अभ्यास केला जात आहे. जर धोरणाच्या अंमलबजावणीस अडथळा ठरणारे नियम असतील, तर त्यात आवश्यक दुरुस्त्याही करण्यात येतील.
लवकरच निर्णय अपेक्षित
सदर आर्थिक मदतीच्या योजनेस अंतिम रूप देण्यासाठी सरकारकडून तयारी सुरू असून, लवकरच प्रस्तावित मसुद्यावर निर्णय घेऊन योजना सुरू केली जाणार आहे. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन व जतन करण्याच्या दिशेने ही योजना एक महत्त्वाची पावले ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.