स्वयंसहाय्य गटांना मिळणाऱ्या माध्यान्ह आहार दरात वाढ

प्राथमिकसाठी ९.३३, उच्च प्राथमिकसाठी १२ रु. प्रति विद्यार्थी दर मिळणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
स्वयंसहाय्य गटांना मिळणाऱ्या माध्यान्ह आहार दरात वाढ

पणजी : गोव्यातील शाळांना माध्यान्ह आहार पुरवठा करणाऱ्या महिला स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या दरात सरकारने वाढ केली आहे. शिक्षण खात्याने याबाबत नुकतेच परिपत्रक काढले आहे. या नवीन दरानुसार, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणाऱ्या गटांना आता प्रति विद्यार्थी प्रति दिन ९.३३ रुपये मिळतील, तर उच्च प्राथमिक (पाचवी ते आठवी) पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी प्रति दिन १२ रुपये देण्यात येणार आहेत.
नवीन परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, प्रधानमंत्री पोषण (माध्यान्ह आहार) योजनेअंतर्गत, गोव्यातील सर्व पूर्व प्राथमिक (बालवाटिका), सरकारी आणि अनुदानित प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळांना माध्यान्ह आहार देणाऱ्या सर्व पालक शिक्षक संघटना, स्वयंसहाय्यता गट आणि महिला मंडळांना १ मे २०२५ पासून साहित्य खर्चात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत जेवणाचा दर्जा, त्याचे प्रमाण, त्यातील कॅलरीज आणि इतर अटी कायम राहतील. त्यानुसार, सर्व संस्थांनी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
सहा महिन्यांतील दुसरी दरवाढ
यापूर्वी शिक्षण खात्याने जानेवारी २०२५ मध्ये दरवाढ केली होती आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा एकदा हे दर वाढवण्यात आले आहेत. नवीन दरवाढ १ मे २०२५ पासून लागू होणार आहे. याआधी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी प्रति दिन ८.७ रुपये, तर पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ११.१ रुपये मिळत होते. हे दर वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती.                    

हेही वाचा