पाच वर्षांत २,१८७ जोडप्यांचा घटस्फोट : ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात प्रमाण जास्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२५ या कालावधीत २,१८७ जोडप्यांनी घटस्फोट घेतले किंवा विवाह रद्द केले. यातील २८.४४ टक्के म्हणजे ६२२ विवाह लग्नाची वर्षगाठ होण्याआधी किंवा धार्मिक विधी होण्यापूर्वीच रद्द करण्यात आले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात घटस्फोटाचे प्रमाण जास्त अाहे. या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात वरील कालावधीत २,१८७ घटस्फोट झाले. त्यातील ७१.५६ टक्के म्हणजे १,५६५ घटस्फोट एका वर्षाहून जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर घेतले गेले, तर २८.४४ टक्के म्हणजे ६२२ जोडप्यांचे अन्नुलमेंट किंवा विवाह रद्द झाले. ग्रामीण भागातील काणकोण, डिचोली, पेडणे, केपे, सांगे, सत्तरी आणि धारबांदोडा तालुक्यांत २४.८७ टक्के, म्हणजे ५४४ घटस्फोट झाले. शहरी भागातील सासष्टी, बार्देश, मुरगाव, तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांत ७५.१३ टक्के म्हणजे १,६४३ घटस्फोट झाले. २०२० मध्ये २५३, २०२१ मध्ये २६५, २०२२ मध्ये ३८२, २०२३ मध्ये ४६४, २०२४ मध्ये ५६७, तर २०२५ मधील पाच महिन्यांत २५६ मिळून २,१८७ घटस्फोट झाले. त्यामुळे वरील आकडेवारी पाहिल्यास घटस्फोट घेणाऱ्यांच्या संख्येत वर्षागणिक वाढच होत आहे.
वरील आकडेवारीनुसार, सासष्टीत सर्वाधिक ६१६, तर सर्वांत कमी धारबांदोडा तालुक्यात १२ घटस्फोट झाले. त्यानंतर बार्देश ३२५, तिसवाडी २५१, मुरगाव २४६, फोडा २०५, डिचोली १३३, केपे ११०, सत्तरी १०५, काणकोण ६९, पेडणे ६०, तर सांगे तालुक्यात ५५ घटस्फोट झाले.
अन्नुलमेंट किंवा विवाह रद्द करण्याची अनेक कारणे आहेत. प्रमुख कारण म्हणजे दुसऱ्यांदा लग्न करणे, अल्पवयीन विवाह, संमतीचा अभाव (फसवणूक, जबरदस्ती किंवा दबावामुळे) आणि नपुंसकता.