तांत्रिक त्रुटींमुळे अडचणी : नागरी पुरवठा खात्याची माहिती
पणजी : राज्यातील रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया तांत्रिक त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणावर रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ १५ दिवसांतच ३०० लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अयशस्वी ठरली आहे. १५ जून रोजी रद्द झालेल्या केवायसींची संख्या ३७८९ होती, जी ३० जूनपर्यंत ४१५३ वर पोहोचली आहे.
राज्यात सुमारे ९.७४ लाख रेशन कार्डधारकांपैकी ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, त्यापैकी ४१५३ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे रद्द झाली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याकडून देण्यात आली.
लाभार्थ्यांनी सोसायटीत जाऊन आधारकार्ड लिंक करून ई-केवायसी केली खरी, परंतु ही माहिती पोर्टलवर पोहोचल्यावर तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे ती अमान्य ठरवण्यात आली. या त्रुटींमध्ये आधार क्रमांक व बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) जुळण्यात अयशस्वी ठरणे ही प्रमुख अडचण ठरत आहे.
ई-केवायसीची सर्व माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर पाठवली जाते, जिथे ती प्रमाणित केली जाते. प्रमाणनाच्या वेळी आधार तपशिलांमध्ये विसंगती आढळल्यास, त्या केवायसीला मान्यता मिळत नाही आणि ती आपोआप रद्द होते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी २३०० जणांची ई-केवायसी प्रक्रिया रद्द झाली. यातील १२७५ उत्तर गोव्यातील, तर १०२५ दक्षिण गोव्यातील लाभार्थी आहेत. गरीबी रेषेखालील (एपीएल) लाभार्थ्यांपैकी १८५३ जणांची ई-केवायसी रद्द झाली. यामध्ये ८९४ उत्तर गोव्यात, तर ९५९ दक्षिण गोव्यातील लाभार्थ्यांचा समावेश आहे.
एनएफएसए अंतर्गत एएवाय आणि पीएचएच प्रकारातील ७३.९१ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. एपीएल गटातील केवळ ५३.७४% लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पुन्हा केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक
नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की अशा रद्द झालेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा सोयीस्कर रीतीने प्रक्रिया तपासावी आणि आवश्यक असल्यास केवायसी पुन्हा करावी. ही परिस्थिती लक्षात घेता, लाभार्थ्यांनी आधार कार्डातील माहिती अचूक आणि अपडेटेड ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे, अन्यथा रेशनचा लाभ घेण्यात अडथळा येऊ शकतो.