दहा वर्षांतील आकडेवारी : मधुमेहामुळे मृत्यू १२५ टक्क्यांनी वाढले
गोवन वार्ता
पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीशी संबधित आजारांत वाढ होत आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, लठ्ठपणा अशा विविध आजारांचा समावेश आहे. मागील दहा वर्षांत गोव्यात कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत ५६.६१ टक्क्यांनी, तर मधुमेहाने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत तब्बल १२५.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात वर्षाला होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, क्रॉनिक लिव्हर डिसिज आणि सिऱ्होसिस यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही अधिक आहे. सांख्यिकी खात्याच्या अहवालांतून ही माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यात हृदयविकारानंतर कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. राज्यात २०१५ ते २०२४ दरम्यान विविध प्रकारच्या कर्करोगांनी ११ हजार ७४ लोकांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ वर्षाला सरासरी १,१०७, तर दिवसाला सरासरी ३ जणांचा कर्करोगाने मृत्यू झाला. २०१५ मध्ये कर्करोगाने ९१५ जणांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये ही संख्या वाढून १,४३३ झाली. ही मागील दहा वर्षांतील कर्करोगाने झालेल्या सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. दहा वर्षांत कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण ५६.६१ टक्क्यांनी वाढले आहे.
कर्करोगानंतर मधुमेहामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २०१५ ते २०२४ दरम्यान मधुमेहाने (डायबेटीस मलायटस) १० हजार ९२ लोकांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ८४, तर दिवसाला सरासरी २ जणांचा मधुमेहाने मृत्यू झाला. २०१५ मध्ये मधुमेहाने ५६८ जणांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये ही संख्या वाढून १,२८२ झाली. दहा वर्षांच्या कालावधीत २०२३ मध्ये सर्वाधिक १,४९४ रुग्णांचा मृत्यू झाला. मागील दहा वर्षांत मधुमेहाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या १२५.७० टक्क्यांनी वाढली आहे.
क्रॉनिक लिव्हर डिसिजमुळे दिवसाला सरासरी २ मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २०१५ ते २०२४ दरम्यान क्रॉनिक लिव्हर डिसिज आणि सिऱ्होसिसमुळे ८,८५२ जणांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ७३, तर दिवसाला सरासरी दोघा जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये या आजारांमुळे ८५६ जणांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये १,१९३ जणांचा मृत्यू झाला. क्रॉनिक लिव्हर डिसिज आणि सिऱ्होसिसमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्या ३९.३६ टक्क्यांनी वाढली आहे.