आंतरराज्य चोरांच्या टोळीतील तिघे कणकवली पोलिसांच्या ताब्यात

टॅक्सी चालकावर केला होता प्राणघातक हल्ला; चोरीतही सहभाग


14th July, 04:51 am
आंतरराज्य चोरांच्या टोळीतील तिघे कणकवली पोलिसांच्या ताब्यात


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मालपे-पेडणे येथे बुधवारी रात्री अज्ञातांनी टॅक्सी चालकावर हल्ला केला होता. रायबंदर येथे घरफोडीही केली होती. या प्रकरणात तुळजापूर (महाराष्ट्र) येथील टोळीचा सहभाग असून त्यातील तिघांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीला मूळ हुबळीतील आणि सध्या वास्कोतील वासीम आणि प्रेम यांनी गोव्यात चोरी करण्यासाठी आणले होते, असे चौकशीतून समोर आले.
टॅक्सीचालक संजीवन वेंगुर्लेकर यांनी पेडणे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, कळंगुट येथून भाड्याने टॅक्सी करून हे संशयित महाराष्ट्रात निघाले होते. बुधवारी रात्री त्यांनी मालपे येथे प्राणघातक हल्ला करून वेंगुर्लेकर यांना जखमी केले. त्यानंतर संशयित सावंतवाडीच्या दिशेने पळाले. संशयितांनी सावंतवाडी शिल्पग्राम परिसरातून दोन दुचाकी आणि हेल्थ पार्क येथे झोपलेल्या कामगारांचे मोबाईल चोरले. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी टोळीतील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. नंतर त्याला मेरशीतील ‘अपना घरा’त ठेवले.
सावंतवाडीतील चोरी प्रकरणी रविवारी कणकवली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोघे फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
वासीमने चोरीसाठीच टोळीला आणले गोव्यात
पोलिसांनी रात्रीची नाकाबंदी केली होती. गुरुवारी रात्री २.४५ वा. धुळापी येथे जुने गोवा पोलिसांना एका कारमध्ये चोरीसाठी लागणाऱ्या वस्तू सापडल्या. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ते मूळचे हुबळीतील आणि वास्कोत रहात असून त्यांचे नाव वासीम आणि प्रेम आहे. त्यांचा सहभाग टॅक्सी चालकावर हल्ला करणाऱ्या टोळीशी असल्याचे समोर आले. वासीम यानेच तुळजापूर येथील या टोळीला गोव्यात चोरी करण्यासाठी आणल्याचे स्पष्ट झाले.