विधानसभेचे पावसाळी अधिवेशन : विरोधकांंची रणनीती उद्या ठरणार

विरोधी पक्ष नेत्यांनी मंगळवारी बोलावली बैठक


13th July, 11:43 pm
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन : विरोधकांंची रणनीती उद्या ठरणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेस, आपसह अन्य विरोधी पक्षांंची रणनीती मंंगळवारी निश्चित होणार आहे. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी विरोधी आमदारांंची मंंगळवारी बैठक बोलावली आहे. विधानसभेत काँग्रेसचे ३, आपचे २, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीचा प्रत्येकी १, असे एकूण ७ विरोधी आमदार आहेत.
विरोधी पक्ष नेते युरी यांनी यापूर्वीच बैठक बोलावली पाहिजे होती. अधिवेशनातील कामकाज ठरल्यानंतर बैठक घेऊन उपयोग होणार नाही. बैठकीला जायचे की नाही याबाबत अद्याप ठरवलेले नाही, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात प्रश्नोत्तरासह अर्थसंंकल्पीय चर्चा, तसेच खात्यांंच्या मागण्यांंवर चर्चा होईल. खासगी कामकाजासाठी तीन दिवस असणार आहेत. सत्ताधारी गटाकडे ३२ आमदार आहेत. बिघडलेली कायदा सुव्यवस्था, वाढती बेरोजगारी, अॅप अॅग्रिगेटरची मार्गदर्शक तत्त्वे, म्हादई आदी प्रश्नांंवर विरोधी आमदार सरकारला कोंडीत पकडतील, अशी अपेक्षा आहे.