आसगाव पठारावरील कचरा हटविण्याचे म्हापसा पालिकेला निर्देश

पर्यावरण खात्याकडून ऑक्टोबरपर्यंतची मुदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
आसगाव पठारावरील कचरा हटविण्याचे म्हापसा पालिकेला निर्देश

म्हापसा : आसगाव पठारावरील कचऱ्याविषयी म्हापसा पालिका न्यायालय आणि प्रदूषण मंडळाच्या आदेशांचे पालन करण्यास अपयशी ठरली आहे. परिणामी येत्या ऑक्टोबर २०२५ पर्यंत या जागेवरील सर्व कचरा हटवण्याचे निर्देश पर्यावरण खात्याच्या सचिवांनी पालिकेला दिले आहेत.

एप्रिल २०२४ मध्ये आसगाव कोमुनिदादच्या पाठपुराव्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हापसा पालिकेला आसगाव कचरा स्थळी नवीन कचरा न टाकणे, पावसाळ्यात कचरा मिश्रीत पाणी भूगर्भात झिरपू नये यासाठी एकाच ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा तयार करावा. ढिगारा ताडपत्रीने झाकावा किंवा हा संपूर्ण कचरा कुचेली कचरा प्लांटवर हलवावा, यासह विविध उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले होते. यासाठी मंडळाने पालिकेला एका महिन्याची मुदत दिली होती. तरीही पालिकेने वरील आदेशांचे अनुपालन केले नसल्यामुळे आसगाव कोमुनिदादने पर्यावरण खात्याकडे धाव घेतली होती.

मान्सून सुरू झाला असूनही म्हापसा पालिका कचरा साफ करण्यास अपयशी ठरली आहे. परिणामी या दूषित कचऱ्याचे पाणी झिरपून आसगाव गावातील भूगर्भ आणि पृष्ठ भागावरील पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे गावावर आरोग्य आणि दुर्गंधीची समस्या ओढवली आहे, असा दावा कोमुनिदादने या तक्रारीत केला होता.

पर्यावरण सचिवांनी यानंतर वरील आदेश दिला आहे. नगरपालिकेने ऑक्टोबर पर्यंत कचरा साफ केला नाही तर राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय कोमुनिदाद समितीने घेतला आहे.

आसगाव कोमुनिदादचे अॅटर्नी नेल्सन फर्नांडिस म्हणाले की, आसगाव पठार कचरास्थळी म्हापसा पालिकेकडून बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात आहे. हा प्रकार केवळ उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत नाही तर स्थानिक परिसंस्थेचे गंभीर नुकसान करत आहे.

म्हापसा पालिका हा कचरा साफ करण्याबाबत गंभीर नाही. तसेच कुचेली प्लांटवर कचऱ्याचे वर्गीकरण करून साळगाव घन कचरा प्रकल्पात कचरा पाठवण्यास सांगण्यात आले होते. ज्यावर देखरेख केली जात नाही. शिवाय गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ देखील योग्यरित्या उपाययोजना करत नाही. सर्व कचरा याच ठिकाणी टाकला जातो. हा धुळफेक करण्याचा प्रकार आहे, असा दावा फर्नांडिस यांनी केला.

आसगाव कोमुनिदादच्या परवानगीविना कचरा टाकण्याच्या ठिकाणी म्हापसा पालिकेने बेकायदेशीररित्या एमआरएफ शेड बांधल्या आहेत. या शेड पाडण्यासाठी कोमुनिदाद आसगाव पंचायत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे, असे अॅटर्नी नेल्सन फर्नांडिस यांनी सांगितले.