संशयिताला सात दिवसांची पोलीस कोठडी
पणजी : वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली तिसवाडी तालुक्यातील एका महिलेची ३.२७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी रज्जब हुसेन (जोधपूर राजस्थान) या संशयिताला अटक केली. त्याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोनापावला येथील दीपा योगी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ५ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता अज्ञात व्यक्तीने वॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधला. त्याने तिला घरातून काम करण्याचा ऑफर दिली. तसेच तिला वेगवेगळ्या हॉटेल्सना रेटिंग देण्याचे काम करण्यास सांगितले. त्यासाठी तिला वॉट्सअॅप क्रमांकावरून संदेश पाठविले. याच दरम्यान तिला टेलिग्राम अॅपच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले. त्यानंतर तिला जीपे आणि इतर अॅपद्वारे ३.२७ लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. तिची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान संशयित जोधपूर राजस्थान येथे असल्याचे पोलिसांना समजले. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक साहीन शेट्ये, काॅन्स्टेबल प्रथमेश मळीक, गौतम मटकर, आदित्य म्हार्दोळकर, अमोल हट्टेकर या पथकाने संशयित रज्जब हुसेन (जोधपूर राजस्थान) याचा शोध लावला. त्यानंतर त्याला गोव्यात आणून अटक केली. संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली.