स्थिती नियंत्रणात न आल्यास जुन्या फेरीबोटी करणार तैनात
पणजी : रो-रो फेरीचा पहिला दिवस गोंधळात गेला. रायबंदर धक्क्यावर प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे रो-रो फेरीतील प्रवाशांचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. हीच स्थिती पुढेही नियंत्रणाबाहेर जात राहिली, तर आम्ही आमच्या जुन्या फेरी बोटी तैनात करू, असे नदी परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते चोडण-रायबंदर या मार्गावरील दोन रो-रो फेरींचे उद्घाटन झाले. या फेरी बोटींपैकी प्रत्येक बोटीत १५ चारचाकी, ४० स्कूटर आणि १०० प्रवासी एकाच वेळेस वाहून नेण्याची क्षमता आहे. ही फेरी रायबंदर ते चोडण हे अंतर सात ते आठ मिनिटांत पार करते. मात्र फेरी बोटीकडे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रवासासाठी लागणारा एकूण वेळ १२ मिनिटांपर्यंत जाऊ शकतो. दोन रो-रो फेरी बोटी आहेत, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
जे कर्मचारी नियमित फेरी सेवा सांभाळतात, ते रो-रो फेरी चालवण्यासाठी सक्षम नाहीत, म्हणून गर्दीचे नियंत्रण राखणे कठीण झाले आहे.
सकाळी अनेक नागरिक आपल्या कामावर जाण्यासाठी रायबंदर-चोडण मार्गावर ये-जा करतात, त्यामुळे येथे गर्दीचा मोठा ओघ असतो. नुकतीच सुरू झालेली ‘रो-रो फेरी बोट’ नवीन असल्यामुळे तसेच तिचे कर्मचारी देखील नवीन असल्यामुळे, त्यांना अशा प्रकारच्या गर्दीचा अनुभव नव्हता. त्यामुळे या फेरी बोटीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
ही ‘रो-रो फेरी’ विजय मरीन सर्व्हिस यांना पीपीपी तत्वावर चालवण्यासाठी देण्यात आली आहे. कर्मचारी विजय मरीन सर्व्हिसचे असून त्यांना गर्दी कशी हाताळावी याचा अनुभव नाही. पारंपरिक फेरी बोटींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीसा अनुभव असतो, पण या नव्या मार्गावरील (रायबंदर-चोडण) फेरीबाबत त्यांना पुरेशी माहितीही नव्हती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळी फेरी धक्क्यावर वाहनांची गर्दी झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.
तीन बोटी तत्काळ कार्यान्वित होणारकर्मचाऱ्यांना केवळ दोन दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यानंतर लगेचच फेरी बोट चालवायला लावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. जर संध्याकाळच्या वेळी देखील अशीच गर्दी झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली, तर खात्यामार्फत तीन नियमित फेरी बोटी तत्काळ कार्यान्वित करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.