गोव्यात यूपीआयद्वारे दररोज सरासरी १६२.१३ कोटींचे व्यवहार

फोनपेसह बँकांच्या अॅपचा वापर : महाराष्ट्रात सर्वाधिक ७.८७ लाख कोटींचे व्यवहार

Story: पिनाक कल्लोळी |
2 hours ago
गोव्यात यूपीआयद्वारे दररोज सरासरी १६२.१३ कोटींचे व्यवहार

गोवन वार्ता
पणजी : गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारतर्फे डिजिटल पेमेंट करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. विविध डिजिटल पेमेंट पर्यायांपैकी यूपीआय अॅप हे वापरण्यास सोपे, सुरक्षित असल्याने याद्वारे व्यवहार करणे लोकप्रिय होत आहे. मागील तीन महिन्यांत राज्यात यूपीआय अॅपद्वारे दररोज सरासरी १६२.१३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यूपीआय अॅपमध्ये फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीम पे सह, राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांच्या अॅपचा समावेश आहे. केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल, मे आणि जून महिन्यांत विविध प्रकारच्या यूपीआय अॅपद्वारे गोव्यात एकूण १४ हजार ७५४ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ४,९१८.०३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. महिन्यानुसार पाहता, एप्रिलमध्ये ५,०४१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. मे महिन्यात यात वाढ होऊन ते ५,६५९ कोटी रुपये झाले. जून महिन्यात यामध्ये १,५७६ कोटी रुपयांची घट झाली. जून महिन्यात यूपीआय अॅपद्वारे ४,०५३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या तिन्ही महिन्यांत यूपीआयद्वारे पेमेंट करण्यात गोवा देशात २३ व्या स्थानी राहिला.
संपूर्ण देशाचा विचार करता, वरील तीन महिन्यांत महाराष्ट्रात सर्वाधिक ७.८७ लाख कोटी रुपयांचे व्यवहार हे यूपीआय अॅपद्वारे करण्यात आले आहेत. यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. तर नागालँड, त्रिपुरा, मणिपूर या राज्यात युपीआय अॅपद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण कमी आहे. केंद्रशासित प्रदेशात दिल्लीमध्ये सर्वाधिक १.९० लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. वरील कालावधीत संपूर्ण देशात सर्वाधिक १.८७ लाख कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार हे ग्रोसरी अथवा सुपर मार्केटमध्ये झाले आहेत. त्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये बिल देणे, डिजिटल वस्तू विकत घेण्यासाठी असे व्यवहार झाले आहेत.
तीन महिन्यांत १०.५ कोटी ट्रान्झॅक्शन
अर्थ खात्याच्या आकडेवारीनुसार, गोव्यात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत झालेल्या एकूण व्यवहारांसाठी १०.५ कोटी ट्रान्झॅक्शन झाले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ३.५ कोटी, तर दिवसाला सरासरी ११.५३ लाख ट्रान्झॅक्शन अॅपद्वारे झाले आहेत.