गोविंद गावडेंच्या कार्यकाळातील खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना हटविले

नऊ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी : डॉ. अजय गावडे क्रीडा संचालक


7 hours ago
गोविंद गावडेंच्या कार्यकाळातील खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना हटविले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मंगळवारी कार्मिक खात्याने नऊ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. गोविंद गावडे मंत्री असताना त्यांच्या खात्याचे प्रमुख असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सभापती रमेश तवडकर यांना अत्यंत नजीकच्या, तसेच गावडे यांनी दूर केलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. डॉ. अजय गावडे हे त्यातील एक आहेत. गोविंद गावडे यांच्या कार्यकाळातील अधिकाऱ्यांना पुराभिलेख, शिष्टाचार अशी खाती दिली आहेत.
उत्तर गोवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे डॉ. अजय गावडे यांची क्रीडा खात्याचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिष्टाचार खात्याच्या संयुक्त सचिवपदी असणाऱ्या विवेक नाईक यांची कला संस्कृती खात्याचे संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. क्रीडा खात्याचे संचालक अरविंद खुटकर यांची पुराभिलेख संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांची शिष्टाचार खात्याचे संयुक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
लोकायुक्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अाग्नेलो फर्नांडिस यांची कृषी खात्यात संचालक (प्रशासन) पदी बदली करण्यात आली आहे. कृषी खात्यात संचालक (प्रशासन) पदी असणाऱ्या मधू नार्वेकर यांची मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी असलेल्या मेल्विन वाझ यांची लोकायुक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तुरुंग अधीक्षक शंकर गावकर यांची कला अकादमीच्या सदस्य सचिवपदी, तर दिनेश पवार यांची उत्तर गोवा मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक सुचेता देसाई यांची कोलवाळ कारागृहाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.