माती हटवून खोदलेला रस्ता चकाचक करा; अन्यथा कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांची वीज खात्याला तंबी


8 hours ago
माती हटवून खोदलेला रस्ता चकाचक करा; अन्यथा कारवाई

फोटो : अंकित यादव
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गिरीमधील बस्तोडा जंक्शनजवळील राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली आहे. वीज खात्याने ४८ तासांत सर्व माती आणि ढिगारे रस्त्यावरून हटवून रस्ता सुरक्षित व वाहतुकीसाठी योग्य स्थितीत आणावा. ७२ तासांत साफसफाईनंतरच्या फोटोसह अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिले आहेत.

वीज खात्याने काही दिवसांपूर्वी भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामासाठी रस्ता खोदला होता. आता मुसळधार पावसामुळे तेथे चिखल साचल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.रस्त्याच्या दुरवस्थेची जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दखल घेऊन वीज खाते आणि संबंधित कंत्राटदारांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत आर्थिक दंड, परवानग्यांचे निलंबन आणि कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल गुन्हेगारी जबाबदारी निर्धारित करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या आदेशात देण्यात आला आहे. हा आदेश सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीचा आणि बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.