रामनगर येथील शेतकरी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी

बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
7 hours ago
रामनगर येथील शेतकरी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी

जोयडा : तालुक्यातील रामनगर येथील मारुती माळेकर (४९) या शेतकऱ्यावर मंगळवारी संध्याकाळी अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यांच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत.

आपल्या शेतातून घरी येत असताना अस्वलाने अचानकपणे मारुती यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली. मात्र, अस्वलाने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. हात, पायाच्या मांडीला चावा घेत नखांनी ओरबाडून रक्तबंबाळ केले. यानंतर अस्वल पळून गेले. त्याचस्थितीत त्यांनी चार कि.मी. चालत घर गाठले.

मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. नानेगाळी येथील शेतातील काम आटपून रामनगर येथे आपल्या घरी जाण्यासाठी ते निघाले होते. शेतातून बाहेर पडून रस्त्यावरुन मारुती मळेकर चालत येत असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अस्वलाने मारुती यांच्या डोक्यावर प्रहार केला असून हात व पायाला मार लागला आहे. डोक्याला दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी आहेत. याची माहिती रामनगर परिसरात वेगाने पसरताच अनेकजण घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तत्काळ रामनगर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेचा पंचनामा वन अधिकाऱ्यांनी केला आहे.