म्हापसा शहरात सीसीटीव्हीचे जाळे

खासदार निधीतील १ कोटींचा करणार खर्च

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
म्हापसा शहरात सीसीटीव्हीचे जाळे

 म्हापसा शहरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यामया संयुक्त बैठकीत चर्चा करताना उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, नगरसेवक, पोलीस व अधिकारी.              

म्हापसा : म्हापसा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची महत्त्वाकांक्षी योजना अंतिम टप्प्यात आली असून, यासाठी खासदार निधीतून १ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सोमवार, १४ जुलै रोजी संध्याकाळी म्हापसा पालिकेत एक संयुक्त बैठक उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस नगरसेवक, पालिका अभियंता, म्हापसा पोलीस, वाहतूक पोलीस प्रतिनिधी, तसेच गोवा इन्फोटेक मंडळ लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक यादीनुसार ८३ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. मात्र, काही ठिकाणी नोंदींची पुनरावृत्ती आढळल्याने अंतिम यादीतील स्थळांची संख्या थोडी कमी होण्याची शक्यता आहे.
बैठकीत म्हापसा बाजारपेठ, शहर प्रवेशद्वार, बस स्थानक, हुतात्मा चौक, शाळा व महाविद्यालये यांसारख्या प्रमुख व गर्दीच्या ठिकाणी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, शेजारील भागांतून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ब्लॅक स्पॉट्स' देखील या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
दोन टप्प्यांमध्ये होणार अंमलबजावणी
उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट यांनी सांगितले की, पालिकेच्या सर्व २० प्रभागांमध्ये कॅमेरे बसवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये आणि शहर प्रवेशद्वार येथील कॅमेरे बसवले जातील, तर दुसऱ्या टप्प्यात इतर भागांचा समावेश असेल.
खासदार निधीतून आर्थिक मदत
या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी तोंडी चर्चा झाली असून, त्यांनी खासदार निधीतून १ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, असेही भिवशेट यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा