पंजाबमधील युवकाला अटक
पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले. त्याचे बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करत १८ लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने सुरेंद्र कुमार (१९, लुधियाना, पंजाब) या युवकाला अटक केली.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी - बार्देश येथील एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने ३ जून रोजी तक्रार दाखल केली. मुंबई येथील केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाची (सीबीआय) अध्यक्ष असल्याचे भासवून रश्मी शुक्ला हिने तक्रारदाराला व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कॉल केले. तक्रारदाराचे एटीएम कार्ड आणि वैयक्तिक माहिती जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराला व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्यावर देखरेख ठेवली जात असल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. हे प्रकरण मिटवण्यासाठी संशयितांनी तक्रारदाराला १ जून पूर्वी आयडीएफसी बँकेच्या एका खात्यात १८ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. सायबर विभागाने यावर तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सायबर विभागाने अधिक चौकशी केली असता, संशयित पंजाबमधील असल्याचे समोर आले. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता आणि सहाय्यक अधीक्षक अक्षत आयुष्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक आणि सिद्दरमया मठ या कर्मचाऱ्याचे पथक पंजाबला रवाना करण्यात आले. पथकाने संशयित सुरेंद्र कुमार (१९, लुधियाना, पंजाब) याच्या मुसक्या आवळून गोव्यात आणून अटक केली. संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयिताला चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली.
सायबर गुन्ह्यांविरोधात गोवा पोलीस सज्ज
सायबर गुन्ह्यांशी लढा देण्याच्या आणि डिजिटल धोक्यांपासून जनतेचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या ध्येयासाठी गोवा पोलीस वचनबद्ध आहेत. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा, पैशाची मागणी करणाऱ्या अज्ञात संदेशांना किंवा कॉलना प्रतिसाद देण्यापासून दूर राहण्याचा आणि अशा घटनांचा त्वरित जवळच्या पोलीस स्थानकात किंवा १९३० क्रमांकावर तक्रार करण्याचा सल्ला सायबर विभागाने दिला आहे.