बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणात असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला लुटले
पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) अधिकारी असल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले. तसेच त्याचे बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करत २.१४ कोटी रुपयाचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने रोहन जाधव (२५, नाशिक - महाराष्ट्र) या युवकाला अटक केली.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसगाव-बार्देश येथील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यांना टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने वॉट्सअॅप कॉल केला. तक्रारदाराचे नाव नरेश गोयल या मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. हे प्रकरण मिटवण्यासाठी संशयितांनी तक्रारदाराला ३० मे पासून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २ कोटी १४ लाख ४० हजार १३२ रुपये जमा करण्यास भाग पाडले.
सायबर विभागाने यावर तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, संबंधित बँक खाते नाशिक (महाराष्ट्र) येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता आणि अतिरिक्त अधीक्षक अक्षत आयुष्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक कुणाल वेर्लेकर, कॉ. सिद्धेश पाळणी, आदित्य नाईक हे पथक महाराष्ट्रात रवाना करण्यात आले. त्यानंतर पथकाने रोहन जाधव या युवकाच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर संशयिताला गोव्यात आणून अटक करण्यात आली.
ब्लॉकिंगसाठी ६७२ नोटीस जारी
पोलिसांनी ऑक्टोबर २०२४ ते १५ जुलै २०२५ दरम्यान संशयास्पद संकेतस्थळे, सोशल मीडिया अकाऊंट आणि वॉट्सॲप इत्यादी ब्लॉक करण्यासाठी ६७२ नोटीस जारी केल्या आहेत. दरम्यान, मे २०२५ मध्ये सर्वाधिक २७० नोटीस काढण्यात आल्या होत्या. याशिवाय वरील कालावधीत ९३६ मोबाईल तर १३४ आयएमईआय ब्लॉक करण्यात आले आहेत.