स्वत:हून घरातून निघून गेल्याचे तपासात उघड
मडगाव : मडगाव परिसरातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी कोल्हापुरात सापडली. याप्रकरणी संबंधित मुलीच्या पालकांकडून दाखल तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात मुलीने स्वतःच्या इच्छेने पलायन केले होते, हे समोर आले आहे.
मुलगी ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मडगाव येथील राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली होती. यानंतर अंजुम शेख यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवण्यात आला. गोवा बाल संरक्षण कायद्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मडगाव पोलिसांनी मुलीचा शोध कोल्हापुरात लावला. तिच्यासोबत असलेल्या एका युवकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत मुलीने पोलिसांना सांगितले की, ती आपल्या स्वखुशीने त्या युवकासोबत गेली होती. यानंतर गुन्ह्याच्या स्वरूपात बदल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली.
मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची नोंद घेतली असून बाल संरक्षण कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित युवकाविरोधात कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे मडगाव पोलिसांनी सांगितले.
लग्नाच्या दबावामुळे पलायन
पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले की, सदर मुलीची आई वारली असून ती शिक्षण सोडून घरकाम करत होती. तिच्यावर लग्नासाठी वारंवार दबाव आणला जात होता. या कारणांमुळे ती मानसिकदृष्ट्या तणावाखाली होती आणि त्यातूनच तिने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.