अधिवेशन : गोवा फॉरवर्ड, आरजीचा रुसवा जाईना...

विरोधकात फूट : सरकारला घेरण्याची काँग्रेसची रणनीती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
अधिवेशन : गोवा फॉरवर्ड, आरजीचा रुसवा जाईना...

पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ऑगस्ट या कालावधीत सुरू होणार असून काँग्रेस विधानसभेचे नेते युरी आलेमाव यांनी अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) आमदारांनी बहिष्कार टाकला. मात्र, आपचे आमदार वेंन्झी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा या बैठकीला उपस्थित होते. ‍यावेळी आलेमाव यांनी राज्याच्या हितासाठी विरोधी आमदारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
या बैठकीला काँग्रेस सदस्य एल्टन डिकॉस्ता आणि अ‍ॅड. कार्लोस फेरेरा उपस्थित होते. कार्यकारी सल्लागार समितीच्या बैठकीनंतर काँग्रेस विधिमंडळ सदस्याची बैठक झाली. यावेळी इतर विरोधी आमदारांना या बैठकीला आमंत्रित केले होते. आरजी आणि गोवा फॉरवर्ड आमदारांना निमंत्रण दिले होते. मात्र, ते आले नाहीत, असे सांगत आलेमाव यांनी त्यांच्या अनुपस्थितीवर भाष्य करण्यास नकार दिला. विधानसभेत आमदारांना सरकारी पक्षाची किंवा विरोधी पक्षाची बाजू घ्यावी लागते. तिसरा असा कोणताही पक्ष नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आलेमाव म्हणाले, काँग्रेस अधिवेशनात सरकारला आर्थिक गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि वाढत्या गुन्हेगारीबद्दल धारेवर धरणार आहे. सरकारचा पर्दाफाश करण्याची एकही संधी आम्ही सोडणार नाही, असेही ते म्हणाले. अर्थसंकल्पीय चर्चेसाठी तीन दिवस आणि मागण्यांसाठी १२ दिवस आहेत. मागण्यांवर चर्चा करण्यासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता होती, असेही त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकूण ७५० प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यापैकी अनेक प्रश्न एकत्र करण्यात आले आहेत. सरकारने तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्नांमध्ये बदलले असून, यावरही आम्ही आवाज उठवणार, असे आलेमाव यांनी सांगितले.गोवा विधानसभेचे हे १५ दिवसांचे पावसाळी अधिवेशन असेल. यात प्रश्नोत्तरांसह अर्थसंकल्पीय चर्चा आणि विभागीय मागण्यांवर चर्चा होईल. तीन दिवसांचे विशेष कामकाजाचे तास देखील असतील. सध्या काँग्रेसचे तीन, आपचे दोन, गोवा फॉरवर्ड आणि आरजीचे प्रत्येकी एक असे एकूण सात विरोधी आमदार आहेत. सत्ताधारी गटाचे मंत्र्यांसह ३२ आमदार आहेत, त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचे विरोधकांपेक्षा जास्त मुद्दे असण्याची शक्यता आहे. तसेच, विरोधी पक्षाच्या आमदारांकडून दररोज दोन लक्षवेधी सूचना घेण्याची मागणीही नाकारण्यात आल्याने आलेमाव यांनी याला ‘लोकशाहीची हत्या’ असे संबोधले आहे.

फॉरवर्ड, आरजीच्या बहिष्काराचे कारण स्पष्ट
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आधीच बैठक बोलावायला हवी होती. आता सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचा काही उपयोग नाही. आरजी अधिवेशनात स्वतंत्रपणे सरकारला विरोध करेल, असे सांगून आमदार वीरेश बोरकर यांनीही बैठकीला उपस्थिती लावली नाही.

हेही वाचा