टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नाविषयी आयएएस अधिकारी अनभिज्ञ!

दामू नाईक : समस्या सोडवण्यासाठी भाजपची समिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th July, 11:43 pm
टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नाविषयी आयएएस अधिकारी अनभिज्ञ!

पणजी : गोव्यातील आयएएस अधिकाऱ्यांना टॅक्सी व्यवसाय आणि टॅक्सी चालकांच्या समस्यांची पुरेशी माहिती नाही. टॅक्सीचालकांच्या प्रश्नाविषयी ते अनभिज्ञ आहेत. या समस्यांवर अभ्यास करण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी पक्षाने एक समिती स्थापन केली आहे. टॅक्सी चालक आणि अॅप अॅग्रीगेटर्स यांच्यातील वादावर तोडगा काढणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, ही समिती टॅक्सी मालकांसह टॅक्सी चालकांशी थेट चर्चा करेल. तसेच, अॅप अॅग्रीगेटर अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती गोळा करून मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करेल. यावेेळी आमदार विविध टॅक्सी संघटनांशीही संवाद साधणार आहेत. या सखोल अभ्यासानंतर, समिती आपला अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करेल.वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी टॅक्सी भाडे नियंत्रित करण्यासाठी टॅक्सी अॅप लाँच करण्याचा निर्धार केला आहे. मात्र, आमदार मायकल लोबो यांच्यासह अनेक आमदारांनी याला विरोध दर्शवला आहे. ओला आणि उबरसारख्या परदेशी कंपन्या राज्यात येण्यास कचरत आहेत, असेही नाईक म्हणाले. सर्व टॅक्सी संघटनांनी अॅप अॅग्रीगेटर सेवेला विरोध केला असून, या मुद्द्यावर अधिवेशनातही चर्चा केली जाईल. या पार्श्वभूमीवर, पक्षाने ही समिती स्थापन केली आहे.
परिवहन खात्याने अॅप अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला होता, त्यावर ३,३०० हुन अधिक आक्षेप प्राप्त झाले आहेत. यापैकी बरेचसे आक्षेप टॅक्सी चालकांनी घेतले असून, सरकारने अद्याप या आक्षेपांवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

टॅक्सी व्यवसाय गोवेकरांच्याच हातात रहावा 

दामू नाईक यांनी नमूद केले की, गोव्यात मोठ्या संख्येने लोक टॅक्सी व्यवसायात गुंतलेले आहेत. हा व्यवसाय गोवेकरांच्या हातात राहणे आवश्यक आहे. काही टॅक्सी चालकांचा चांगला फायदा होतो मात्र, अनेक टॅक्सी चालकांना दिवसा दोन भाडेही मिळत नाहीत. तसेच त्यांना कर्ज काढून हा व्यवसाय चालवावा लागतो. कर्ज घेऊन टॅक्सी व्यवसाय सुरू करणारे गोवेकर कमी नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.