भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती
पणजी : गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदलावर सध्या चर्चा सुरू असली तरी त्याबाबतचा कोणताही निर्णय पावसाळी अधिवेशनानंतरच होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. सध्या सर्व मंत्री आणि आमदार हे अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत असून ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अनुषंगाने भाजप मंत्री आणि आमदारांची एक बैठक आज पणजीत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधेयके, प्रश्नोत्तरांचा ताळमेळ आणि मतदारसंघातील प्रश्न सभागृहात कसे मांडावेत याविषयी मार्गदर्शन केले.
या बैठकीला सरकारला पाठिंबा देणारे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि आंतोन वाझ हे उपस्थित होते. मात्र मगोचे नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने, तर कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित होते. दरम्यान, सिक्वेरा यांची प्रकृती आता सुधारत असून ते अधिवेशनात सहभागी होतील, अशी माहितीही दामू नाईक यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, अधिवेशनात येणाऱ्या प्रश्नांवर सुसूत्र चर्चा व्हावी, म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदारसंघातील समस्या योग्य पद्धतीने सभागृहात मांडता याव्यात यावर भर देण्यात आला.