घाटात वाहतूक ठप्प, आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल.
पणजी : चोर्ला घाटात सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सिमेंट वाहून नेणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. घाटात कोसळलेल्या दरडीतून मार्ग काढत असताना ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडून दरीत पडला. मात्र प्रसंगावधान राखत ट्रकचालकाने वेळीच ट्रकबाहेर उडी मारल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला.
या घटनेमुळे चोर्ला घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळून रस्त्यावर माती आणि दगड आडवे झाल्याने वाहनांना पुढे जाणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून ट्रक बाहेर काढण्याचे आणि मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यांवर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(बातमी अपडेट होत आहे)