जीपीएससीतर्फे ८ जागांवर भरती; विविध खात्यांत संधी

‘डेप्युटेशन’ आणि नियमित पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जाहीर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
जीपीएससीतर्फे ८ जागांवर भरती; विविध खात्यांत संधी

पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यांत ८ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ४ जागा या बदली प्रतिनियुक्ती (ट्रान्स्फर ऑन डेप्युटेशन) द्वारे भरती करण्यात येणार आहे. तर उर्वरित ४ जागा या शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण खात्यातील आहेत. ट्रान्स्फर ऑन डेप्युटेशनसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ जुलै, तर अन्य पदांसाठी २५ ऑगस्ट आहे.
ट्रान्स्फर ऑन डेप्युटेशनद्वारे दक्षता खात्यात वरिष्ठ तंत्रज्ञ परीक्षक पद भरण्यात येणार आहे. यासाठी अधिकारी केंद्र अथवा राज्य सरकारमध्ये अधीक्षक अभियंता अथवा कार्यकारी अभियंता किंवा समतुल्य पदावर कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराला मॅट्रीएक्स लेव्हल १२ प्रमाणे वेतन देण्यात येईल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात सहाय्यक संचालक (आयटी) पद भरण्यात येणार आहे. यासाठी कॉम्प्युटर एप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी अथवा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
याच खात्यात उपसंचालक पदासाठी भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्याकडे कॉम्प्युटर एप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी अथवा टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन यापैकी एका शाखेची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागात कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (अन्न) ही जागा भरली जाणार आहे.
सर्व पदांसाठी अर्जाचे शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरल्यावर अर्ज गृहीत धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे. अर्जावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल योग्य पद्धतीने लिहिण्याचे आवाहन आयोगाने केली आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून आयोगातर्फे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.


नियमित स्वरूपात भरावयाची पदे
- सरकारी तंत्रनिकेतन : आर्किटेक्चरल असिस्टंटशिप
- गोवा कॉलेज ऑफ आर्ट ‍: प्राचार्य
- सरकारी महाविद्यालय : झूलॉजीसाठी सहाय्यक प्राध्यापक
- सरकारी महाविद्यालय : उपसंचालक