‘फोंडा एन्व्होकेअर’ला मान्यता; पीसीबीकडून परिपत्रक जारी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : विविध उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या धोकादायक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मे. फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड या पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील कंपनीला मान्यता देण्यात आली आहे. त्यासंबंधी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी) परिपत्रक जारी केले आहे.
विविध उद्योगांमध्ये औद्योगिक कचऱ्याची निर्मिती होत असते. हा कचरा अनेकदा योग्य विल्हेवाट न लावताच खुल्या जागेत टाकला जातो किंवा पुरून टाकला जातो. कालांतराने त्याचे पर्यावरणीय दुष्परिणाम दिसून येतात. अशाप्रकारे खुल्या जागेत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला मुद्दामहून किंवा अपघाताने आगी लावण्याचे प्रकार घडतात. त्यातून धूर आणि आगीची धग यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पुरण्यात आलेल्या कचऱ्यामुळे जलस्रोतांची हानी झाल्याचे प्रकार घडले आहेत.
हे प्रकार आता ऐरणीवर आल्याने त्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने सरकारने उपाययोजनेवर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून धोकादायक कचरा (व्यवस्थापन आणि सीमापार वाहतूक) नियम, २०१६च्या तरतुदींनुसार सुरक्षित आणि पर्यावरणीयदृष्ट्या योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. धोकादायक कचरा विल्हेवाटीच्या पद्धतींमध्ये पुनर्वापर, सह-प्रक्रियेसह वापर, जाळणे आणि लँडफिलिंग यांचा समावेश आहे. त्यासाठी मंडळाने फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड कंपनीला मंजुरी दिली आहे. सदर सुविधा हाताळण्यासाठी कंपनी सुसज्ज असून तेथे प्रक्रिया होणारा कचरा नंतर सिमेंट भट्टी किंवा समतूल्य सुविधांमध्ये वापरण्यायोग्य बनविण्यात येणार आहे. त्यानुसार धोकादायक कचरा निर्माण करणाऱ्या कंपन्या, उद्योग यांनी आपला कचरा सदर कंपनीकडे सोपविणे सक्तीचे आहे. तेथे योग्य प्रक्रिया करण्यात येईल. नंतर त्याची गोव्यातच विल्हेवाट लावावी व राज्याबाहेरील सुविधांमध्ये वापरण्यासाठी पाठवावा यावर निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. दरम्यान, कंपनी, उद्योगामध्ये निर्माण होणारा धोकादायक कचरा विनाप्रक्रिया किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची लेखी परवानगी न घेता राज्याबाहेरील सुविधांमध्ये सीमापार वाहतूक करता येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. अशी वाहतूक तात्काळ प्रतिबंधित करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात सूचित केले आहे.