मुख्य आरोपी अजूनही फरार
पणजी : कळंगुट येथे रविवारी रात्री घडलेल्या टॅटू व्यवसायातील वादातून झालेल्या सुरी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. या हल्ल्यात अरुण लमाणी (रा. कर्नाटक) गंभीर जखमी झाला असून, मुख्य आरोपी आकाश लमाणी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अरुण शंकर पवार (२६, रा. कोलवा, मूळ गदग, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. त्याने मुख्य संशयित आकाश लमाणीला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला आज मंगळवारी १५ जुलै रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता अटक केली.
नेमके प्रकरण काय ?
सुरीहल्ल्याची घटना खोब्रावाडा-कळंगुट येथील जेजे बेकरीजवळ रविवारी रात्री १.३० वाजता घडली होती. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अरुणने आकाश आणि त्याचा साथीदार पर्शा यांच्यासोबतचा टॅटू व्यवसाय सोडून इतर दुकानात काम सुरू केले होते. जुन्या आर्थिक व्यवहारासंदर्भात बोलणी करण्यासाठी आकाशने अरुणला भेटीस बोलावले होते. पुन्हा सुरू झालेल्या वादातून आकाशने अरुणवर चाकूने हल्ला करून त्याच्या चेहऱ्यावर आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी अरुणला तात्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अरुण पवार याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९(२) आणि २४९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू असून मुख्य आरोपी आकाश लमाणीचा शोध घेतला जात आहे.