अतिवेग, बेशिस्तपणा, वाहतुकीचे उल्लंघन अपघातास कारणीभूत !

चर्चेची वार्तामध्ये वाचकांचा अभिप्राय : सरकार आणि जनतेच्या सहभागाची गरज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
अतिवेग, बेशिस्तपणा, वाहतुकीचे उल्लंघन अपघातास कारणीभूत !

पणजी : ‘गोव्यात रस्ते अपघातांत तरुणांचे मृत्यू होण्याचे प्रमाण ४५ टक्के आहे’ असा प्रश्न दै. गोवन वार्ताच्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवरील ‘चर्चेची वार्ता’ या सदरात विचारण्यात आला होता. यावर विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी अपघातांची अनेक कारणे आणि त्यावरच्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला आहे. राजकारण बाजूला ठेवून या समस्येकडे पाहण्याची आणि सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत अनेक वाचकांनी व्यक्त केले आहे.

अपघाताच्या बातम्या येतात, प्रसारित होतात आणि मग आपण पुढच्या विषयाकडे वळतो. पण प्रत्येक अपघात मृतांच्या, शारीरिकदृष्ट्या सक्षम झालेल्यांच्या किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांवर कायमचा परिणाम करतो. या कथा तरुणाईपर्यंत पोहोचायला हव्यात, जेणेकरून त्यांना हे समजावे की मौजमजा, साहस किंवा बेफिकीर वृत्तीमुळे केवळ एका व्यक्तीचा जीव जात नाही, तर त्याचे परिणाम खूप मोठे आणि दूरगामी असतात. - श्रीपाद नायक

रस्त्यांवरील अपघात-प्रवण ठिकाणी पोलीस नीट तैनात केले, तर निश्चितच अपघातांची संख्या कमी होईल. - रवींद्र सुखटणकर

गोव्यातील रस्त्यांची खराब स्थिती, वेगाने वाहने चालवणे, सिग्नल तोडणे आणि विशेष करून कॉलेजमध्ये जात असलेल्या युवक-युवती अठरा वर्षे पूर्ण न होताच गाडी चालवणे यामुळे अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. पकडले गेलो तर आमदार किंवा मंत्र्याच्या एका फोनमुळे आपण सुटू शकतो, ही भावनाही या वेगाला आणि अपघाताला कारणीभूत आहे. शैलेश देसाई 

रस्ते अपघात होण्यामागे प्रमुख कारण रस्त्यांची दुर्दशा. संपूर्ण गोव्यात रस्त्याची परिस्थितीत बिकट झालेली आहे. पण, अपघातास कारणीभूत फक्त रस्तेच नाही. खासकरून तरुणाई अपघातात मरण पाडण्यामागे आपण आईवडीलही तितकेच जबाबदार आहोत. मुलांचे हट्ट पूर्ण करण्यास आम्हीच त्यांना प्रोत्साहन देतो. आजकालची तरुण पिढी हाताबाहेर चालली आहे. हे अपघाताचे प्रमाण थांबवायचे असेल तर आपल्या मुलांची काळजी घेणे आवश्यक आहेत. एवढे केले तरीही ५० टक्के अपघात कमी होतील. वारंवार सरकारला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. अमिर बेळेकर



रस्ते अपघातात तरुणांचा अकाली मृत्यू होणे ही फारच चिंताजनक बाब आहे. येथील रस्त्यांची अवस्था बघितल्यास वेगवान दुचाक्या चालवणे फारच धोकादायक ठरू शकते. वाहन अपघातग्रस्त होण्यामागे अतिवेग हेच मुख्य कारण आहे. आजचे तरुण वाहनांच्या गतीवरच जास्त भर देत असल्याने अपघातात सापडून ठार होतात. - राजेंद्र पेडणेकर

वाहनचालकाला रस्त्यावर वाहन चालवण्यापूर्वी रस्त्याची पूर्ण कल्पना असावी. वाहन काळजीपूर्वक चालवावे. अशा वेळी मनात दुसरा कोणताही विचार आणू नये. चौकात वाहन चालवताना कमी वेगाने चालवावे आणि शक्य तितके आपल्या बाजूने (लेनमध्ये) राहण्याचा प्रयत्न करावा. - राज लोटलीकर

गोव्यातील वाढत्या अपघातांचे प्रमुख कारण वेगवान वाहनांची वाढती संख्या हे आहे. यावर राजकारण बाजूला ठेवून विचार करणे गरजेचे आहे. केवळ दंड आकारून अपघात कमी होत नाहीत. - अनिल परुळेकर

वाहनचालकांनी केलेले वाहतूक नियमांचे उल्लंघन व बेशिस्तपणा ही त्याची प्रमुख करणे आहेत. - राजेंद्र सावईकर

मागील २० ते ३० वर्षांपासून गोव्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आज बोरी पुलाची जी परिस्थिती झाली आहे, त्याला जबाबदार कोण आहे? भाजप सरकार नव्हे, तर काँग्रेसच्या राजवटीत ज्यांनी ज्यांनी रस्ते आणि पाणी विभागाचे मंत्रिपद सांभाळले होते, तेच याला जबाबदार आहेत. चरणजीत सप्रे

वाहन चालवताना नियम न पाळणे, आपण इतरांपेक्षा जलद गाडी चालवू शकतो, ही भावना यामुळेच अपघात होत आहेत.  उषाकिरण सम्राट

या समस्येला केवळ आणि केवळ पालकच जबाबदार आहेत. आपला मुलगा दारू पितो, गांजा ओढतो, सिगारेट पितो, टपोरीसारखी गाडी चालवतो... सायलेंसरचे आवाज... हे सर्व पालकांना कसे दिसत नाही? - विनोद सुतार

भाजपच्या राजवटीत रस्ते खूपच चांगले झाले आहेत. भाजप सत्तेवर येण्यापूर्वीची परिस्थिती आठवा, तेव्हा रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय होती. दुचाकी चालवण्यात कदाचित काहीतरी दोष असावा. हे अपघात एवढे का वाढले याचा पोलिसांनी तपास करावा. - दया नाईक

अपघाताची अनेक कारणे आहेत. यामध्ये कायद्याचा धाक नसणे, फुकटच्या पैशांचा माज, दारू आणि इतर अनेक गोष्टी. - प्रकाश धुपकर

केवळ रस्ता खराब असणे हे अपघाताचे मुख्य कारण नसते, तर अति वेग आणि चुकीचे/बेफिकीर ड्रायव्हिंग या गोष्टीच अपघातांसाठी प्रामुख्याने जबाबदार असतात. - सुरेश नाईक

हेही वाचा