बार्देश : गिरी येथील रस्त्यावरील माती ४८ तासांत हटवा

आणि अहवाल ७२ तासांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा, अन्यथा ...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th July, 02:44 pm
बार्देश : गिरी येथील रस्त्यावरील माती ४८ तासांत हटवा

पणजी : गिरीमधील बस्तोडा जंक्शनजवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ कडे जाणाऱ्या सर्विस रोडची दयनीय अवस्था झाली आहे. वीज खात्याने येथे काही काळापूर्वी भूमिगत वीज वाहिन्यांचे काम करण्यासाठी रस्त्या खोदला होता. आता मुसळधार पावसामुळे येथे चिखल साचल्याने येथून मार्ग काढताना प्रवाशांची नेहमीच तरांबाळ उडते. येथे अनेकदा जीवघेणे अपघात देखील घडले आहेत. 

 याप्रकरणी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दखल घेऊन वीज विभाग आणि संबंधित कंत्राटदारांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. वीज खात्याने ४८ तासांच्या आत सर्व माती आणि ढीगारे रस्त्यावरून पूर्णपणे हटवून रस्ता सुरक्षित व वाहतुकीसाठी योग्य स्थितीत आणावा. तसेच ७२ तासांच्या आत साफसफाईनंतरच्या फोटोसह अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.  

आदेशाचे पालन न झाल्यास मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत आर्थिक दंड, परवानग्यांचे निलंबन, आणि कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल गुन्हेगारी जबाबदारी निर्धारित करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या आदेशात देण्यात आला आहे. हा आदेश सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीचा आणि बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आठवड्याभरापूर्वी ग्रीनपार्क जंक्शनकडे असलेल्या उड्डाणपुलाजवळ एका प्रवासी बसने स्कुटरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसखाली चिरडल्याने कायदा विभागाचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (५१, रा. रामनगर, कोलवाळ, बार्देश) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा. 

🔴 गिरीत बसखाली चिरडून कायदा खात्याच्या अवर सचिवाचा मृत्यू