दक्षिण गोव्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ

सहा महिन्यांत ३० दुचाकींची चोरी : पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन


13th July, 11:47 pm
दक्षिण गोव्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : दक्षिण गोवा जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. मागील दोन वर्षांत ४५ दुचाकी चोरीची प्रकरणे होती. यावर्षी सहा महिन्यांत ३० दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे.
मागील तीन महिन्यांत मडगाव, फातोर्डा, वेर्णा, कोलवा, केपे, मायना कुडतरी, फोंडा आणि वास्को परिसरातून २० पेक्षा जास्त दुचाकी चोरीला गेल्याची नोंद आहे. याच आठवड्यात नुवे येथील जुझे रॉड्रिग्ज यांच्या राहत्या घरातून स्कूटर, तर राय येथील रुझारिओ डिसोझा यांच्या गॅरेजमधून मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार मायना कुडतरी पोलिसात नोंद केली आहे.
दक्षिण गोव्यात २०२२ मध्ये ६० दुचाकी व कार चोरीला गेल्या होत्या. त्यापैकी ३० वाहने जप्त करण्यात आली होती. २०२३ मध्ये ४३ चोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या, पैकी २८ वाहने जप्त करण्यात आली होती. २०२४ मध्ये एकूण ४३ वाहने चोरीला गेली. त्यातील २३ वाहने जप्त करण्यात आली होती. दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असल्याने पोलिसांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित, जास्त प्रकाश असलेल्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे तसेच कुलूप आणि सुरक्षा उपाययोजनांची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
खुल्यावर पार्किंगमुळे चोरीत वाढ
चोरीच्या घटनांमध्ये वाढ ही पार्किंगच्या अपुऱ्या पायाभूत सुविधांशी निगडित आहे. मडगाव शहरातही दुचाकी खुल्या जागी पार्क केल्या जातात. नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात; मात्र तपास लांबला जातो. पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे किंवा कर्मचारी कमी असल्याने तपासात विलंब होत असल्याची कारणे दिली जात आहेत, अशा तक्रारी नागरिक करत आहेत.
चोरीच्या गाड्यांच्या सुट्या भागांची विक्री
पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक वाहने मोडली जातात. त्यांचे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विकले जातात. काहीवेळा गाडीची ओळख पटू नये म्हणून नंबर प्लेट बदलली जाते किंवा वाहने पुन्हा रंगवली जातात. पोलिसांनीही अनेकदा तपासादरम्यान मोडलेल्या स्कूटर आणि मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

हेही वाचा