मुं बई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुंबईतील वरळी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांचा एकत्रित मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांत युती होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा तिसऱ्या सक्तीच्या भाषेच्या रूपात शिकवण्याच्या धोरणातून माघार घेतल्याचा हा विजयोत्सव होता. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासमोर थेट युतीचा प्रस्ताव ठेवला. राज ठाकरे यांनी या प्रस्तावावर त्वरित प्रतिक्रिया दिली नाही, मात्र उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकीच्या शक्यतेने नवा उत्साह संचारला.
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी युतीसाठी सकारात्मक संकेत देत जनतेच्या दबावामुळे मनसेसोबत एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. इंडी आघाडी या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार झाल्या आहेत. मात्र, महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखावी लागते. शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र आले पाहिजेत, असा जनतेचा कौल असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनीही युतीची शक्यता उघडपणे मान्य केली होती. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवू असे वक्तव्य करीत त्यांनी शिवसेना आणि मनसे यांच्यातील जुने वैचारिक मतभेद विसरून मराठी अस्मिता आणि हक्कांसाठी एकत्र लढण्याची तयारी दर्शवली.
राज ठाकरे यांनी मात्र आपल्या भाषणात थेट युतीबाबत स्पष्टता न दर्शवता, केंद्र सरकारच्या हिंदी सक्ती धोरणावर जोरदार टीका केली. त्यांनी मिश्किल शैलीत बाळासाहेबांना जे जमले नाही, ते फडणवीसांनी करून दाखवल्याचे म्हटले होते.
काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे संकेत दिले होते. या सर्व घडामोडींचा महाविकास आघाडी व इंडी आघाडीच्या एकसंधतेवर परिणाम होऊ शकतो, असे अनेकांचे मत आहे. उद्धव-राज यांच्या संभाव्य युतीमुळे मराठी मतदारांमध्ये नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा थेट परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व अन्य घटक पक्षांच्या भूमिकांवरही होणार आहे. शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती केवळ यापूर्वीच्या भांडणाचा शेवट नसून नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकते. यामुळेच या युतीबाबतच्या चर्चांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
- प्रसन्ना कोचरेकर