गोवा, कोकणातील गणेश चतुर्थीत मृण्मयी मूर्तीच्या माथ्यावर माटोळीची आरास करणे, हे आपल्या पूर्वजांनी महत्वाचे मानले आहे. त्याला कारण एकेकाळी इथल्या माणसांचे जीवन निसर्गावर अवलंबून होते.
भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीचा उत्सव. गोमंतकीयांसाठी हा सण अत्यंत आवडीचा. नोकरी धंद्यानिमित्त बाहेर असलेली कुटुंबे वर्षातून एकदा गणेश चतुर्थीच्या सणात सहभागी होण्यासाठी मोठ्या आत्मीयतेने आणि श्रद्धेने येतात. दीड, पाच, सात... असे चतुर्थी सणाचे दिवस म्हणजे वर्षातील या कुटुंबासाठी एकत्र येण्याचे, आनंद व्यक्त करण्याचे एक समर्थ व्यासपीठ. मोसमी रानफुलांनी श्रावण महिन्यात जे वैभव प्रदर्शित केलेले असते, त्या साऱ्या नैसर्गिक संचिताला माटोळीत आपल्या पूर्वजांनी गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने प्राधान्य दिलेले आहे. माटोळी, गोवा व कोकण भागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सणाला, गणपतीच्या मूर्तीच्या वर मोसमी फळा-फुलांनी सजवून बांधण्यात येते. बांबूंच्या कामट्यांपासून बनवण्यात येणाऱ्या विशिष्ट अशा पारंपरिक चौकटीने माटोळी युक्त असते. अशा माटोळीचे दर्शन गोव्यात चतुर्थीच्या दिवसात घडते. आजूबाजूच्या निसर्गाबद्दल अमाप प्रेम व ओढ असलेल्या आपल्या पूर्वजांची, ही आजच्या काळात लोकशिक्षणासाठीही वापरता येऊ शकते, अशी संकल्पना आहे.
गोव्यात वाळपई, साखळी, बाणास्तरी, सावर्डे, काणकोण या भागात चतुर्थीच्या चार-पाच दिवस अगोदरपासूनच, माटोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी-विक्रीचे, रंगीत बाजार भरतात, ते समाजशास्त्रीय दृष्टीतच नव्हे तर इथली समृद्ध जैविक संपदा आणि तिचा वैविध्यपूर्ण वारसा समजून घेण्याचे साधन आहे.
गोव्यातील सह्याद्रीचा परिसर हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेला असल्याने, तसेच राज्यातील सर्वाधिक सुरक्षित व सधन जंगल क्षेत्र हे सत्तरी, धारबांदोडा, सांगे, काणकोण या गावी असल्याने तेथील बाजार, विविध रंगी फळे, फुले, कंदमुळे, वनस्पती, पाने, अशा माटोळीच्या साहित्याने अक्षरशः रंगून गेलेले पाहता येतात.
माटोळीला कोणकोणती फळे-फुले बांधायची, अन् कोणती बांधू नयेत, यांचे लोकसंकेत ठरलेले असून त्यांचे पालन करून माटोळी सजवण्याची परंपरा रूढ झालेली आहे आणि त्याचे पालन करत गणेश उत्सवाला माटोळी बांधणे इष्ट मानण्यात येते.
गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्यामार्फत जे उपक्रम कार्यान्वित केलेले आहेत, त्यातील माटोळी स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन हा एक स्तुत्य उपक्रम असून, या स्पर्धेच्या निमित्ताने सरकारने पर्यावरण मूल्यांच्या संस्कारासाठी या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केला तर ती महत्त्वपूर्ण बाब ठरेल.
गणपतीची भाद्रपद चतुर्थी ही आवडती तिथी असून पावसाळी मोसमात आपल्या परिसरातील अवघी सृष्टी रंग-गंधाचे लावण्य मिरवत असताना हा सण येत असल्याने आपल्या मृण्मयी पुत्राचा भाद्रपदातील वृक्षवेलींवरील फळा-फुलांनी, कंदमुळांनी अलंकृत करून साजरा करण्याची पृथ्वीमाता पार्वतीची इच्छा, गोवा - कोकणातील लोकमानस पूर्ण करीत असते.
आपल्या परिसरातील वनस्पतीची ओळख व्हावी, त्यांचे गुणधर्म ज्ञात व्हावे, कोणत्या वनस्पती औषधी, विषारी, किंवा दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत हे समजावे म्हणून, गणपतीच्या मस्तकी बांबूच्या कामट्यांनी तयार केलेल्या चौकटीला केवणीच्या सालीपासून काढलेल्या दोऱ्यांनी, फळे, फुले, कंदमुळे, बिया, पाने बांधून माटोळीवर करमलाची पाने घालण्याची परंपरा प्रचलित झाली असावी.
बेहडा, हिरडा, आवळा हे औषधी घटक, तसेच बिबा, काजरा, गेळ, अग्निशिखा (वाघ चपका) यासारखी विषारी गुणधर्म असलेले निसर्गातले वैभव भाद्रपदात वृक्षवेलींवर मिरवत असल्याने त्याचा वापर वनौषधीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी माटोळीच्या सजावटीत कल्पकतेने केला असावा.
गोवा, कोकणातील गणेश चतुर्थीत मृण्मयी मूर्तीच्या माथ्यावर माटोळीची आरास करणे, हे आपल्या पूर्वजांनी महत्वाचे मानले आहे. त्याला कारण एकेकाळी इथल्या माणसांचे जीवन निसर्गावर अवलंबून होते. ऋतुचक्रानुसार कोणकोणत्या वनस्पती आपल्या परिसरात उगवतात, त्यांची पाने - फुले कधी भाजी म्हणून वापरता येतात, तर कधी औषधे म्हणून. याविषयीचे पारंपरिक ज्ञान आपल्या समाजामध्ये प्रचलित होते. परंतु या ज्ञानाचा वारसा नव्या पिढीत रुजवला नाही तर वृक्ष वनस्पतीच्या नावांची तसेच त्यांना ओळखण्याची परंपरा लुप्त होण्याची शक्यता असल्याची जाणीव लोकमानसाला झाली आणि त्यामुळे त्यांनी वयोवृद्ध आणि जाणकारांच्या मदतीने रानावनात जाऊन मोसमी फळे-फुले, कंदमुळे यांच्या विषयीचे ज्ञान प्राप्त केले. त्यासाठी पूर्वीच्या काळी वयोवृद्ध माणसे आपल्या परिसरातील वृक्ष वनस्पतींचे ज्ञान देण्याचा प्रयत्न माटोळीतून करायचे. खरेतर आज माटोळीच्या बाजारात जे जैविक संपदेचे घटक विक्रीला आणले जातात, त्यामुळे त्याचा ताण जंगलांवर आणि वन्यजीवांवर जाणवू लागलेला आहे. आपण परंपरेप्रमाणे माटोळी सजवण्यासाठी ज्या वस्तू गोळा करतो, त्यांची पैदास आपल्या परिसरात व्हावी यासाठी खूप कमी जण प्रयत्न करतात.
होंडा-सत्तरीतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या आसावरी कुलकर्णी यांनी एका खाण कंपनीत काम करत असताना माटोळीसाठी जी झाडे आवश्यक आहेत, त्यांची लागवड करण्यावर भर दिला. त्यामुळे त्या परिसरातील स्थानिकांना माटोळीसाठी आवश्यक घटक प्राप्त होऊ लागले आहेत.
ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन लोकसहभागाने माटोळीतील जैविक संपदेचे घटक उपलब्ध करून देण्याऱ्या वृक्ष वनस्पतींच्या लागवडीने जंगल क्षेत्र निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या वनौषधींच्या विषयीचे ज्ञान प्रत्यक्ष देण्यासाठी निवडक माटोळींच्या सजावटीची आरास आणि त्यामागची प्रेरणा या विषयी ज्ञान देता येते. एकेकाळी गोव्यातील जंगलात माटोळीसाठी लागणारे साहित्य सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायचे, परंतु आज सधन जंगले दुरापास्त होऊ लागल्याने स्थानिकांना माटोळीचे साहित्य आपल्या परिसरातील जंगलामध्ये मिळणे कठीण होऊ लागले आहे. या साऱ्या बाबींचा विचार करून त्याबाबत प्रत्यक्ष कृती कशी होईल, हे पाहिले तर ही परिस्थिती बदलू शकते आणि गणेश चतुर्थीच्या सणाचा आनंद द्विगुणित होईल.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५