तेजस्वी यादव यांचे ‘राहुल एके राहुल’!

राहुल गांधी यांनी याआधीही काढलेल्या यात्रांचा निवडणुकीत कसा फज्जा उडाला आहे, याची जाणीव सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तेजस्वी यादव सोडल्यास 'इंडी'चे अन्य घटक पक्ष या यात्रेत त्यांच्यासोबत क्वचितच दिसतात.

Story: विचारचक्र |
25th August, 10:09 pm
तेजस्वी यादव यांचे ‘राहुल एके राहुल’!

बिहारात पुढील दोन अडीच महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेथील राजकीय वातावरण बरेच ढवळून निघाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्या सहकार्याने जी मताधिकार यात्रा चालू आहे, त्यातून नेमके काय साध्य होईल हा मोठा प्रश्न आहे. स्वतः तेजस्वी यादव हे तर बिहारचे मुख्यमंत्रिपद आपल्याला खुणावतेय, याच तोऱ्यात या यात्रेत वावरत आहेत आणि त्याच उन्मादात त्यांनी राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधानपदही देण्याची घोषणा करून टाकली. येथेच ते थांबले असते तर कदाचित त्यावरून जे पुढील रामायण घडले ते घडलेही नसते. 'देशका पीएम कैसा हो, राहुल गांधी जैसा हो' अशी घोषणाही त्यांनी दिली आणि इंडी आघाडीतील अन्य काही पक्षांच्या नेत्यांच्या पचनी ही गोष्ट पडली नाही. तेजस्वी यादव यांचे दुर्दैव असे की राहुल गांधी यांच्याकडून त्यांना ज्या प्रतिसादाची अपेक्षा होती, तसे काहीही घडले नाही आणि ते अक्षरशः तोंडघशी पडले. 'राहुल एके राहुल' हाच एकमेव पाढा पुऱ्या यात्रेत तेजस्वी यादव घोकत राहिले. पण राहुल गांधी यांनी प्रथमच असा शहाणपणा दाखवला की ते त्या जाळ्यात अडकले नाहीत की जेणेकरून त्यांच्यापुढील अडचणीत भरच पडली असती. राहुल गांधी यांचे पंतप्रधानपद असो वा तेजस्वी यांचे मुख्यमंत्रिपद, हे दोन असे विषय आहेत की विरोधी 'इंडी' आघाडीत त्यावर मतैक्य होण्याची सुतराम शक्यता नसताना मताधिकार यात्रेच्या दरम्यान त्यावर कोणी अधिकारवाणीने बोलणे म्हणजे मूळ मुद्दा बाजूला ठेवून भलतीकडेच भरकटण्याचाच प्रकार आहे.

राहुल गांधी यांना अर्थातच ‘मतचोरी’च्या नावाखाली देशात सर्वत्र असा भ्रम पसरावयाचा आहे की मोठ्या प्रमाणावर ‘मतचोरी’ केली जात असल्यानेच भारतीय जनता पार्टीला सगळीकडे यश मिळत आहे. निवडणूक आयोगाकडून त्याचा पर्दाफाश झाल्यानंतरही राहुल गांधी यांचे तुणतुणे वाजण्याचे थांबलेले नाही, उलट बिहारमध्ये अधिक उत्साहाने त्यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत मतदार अधिकार यात्रा  सुरू केलेली आहे. त्याचा कितपत लाभ काँग्रेसला वा त्यांच्या मित्र पक्षांना मिळेल, याची शंकाच आहे. राहुल गांधी यांची ही काही पहिलीच यात्रा नाही. याआधीही त्यांनी काढलेल्या यात्रांचा निवडणुकीत कसा फज्जा उडाला आहे, याची जाणीव सगळ्यांनाच आहे. त्यामुळे लालूपुत्र तेजस्वी यादव सोडल्यास 'इंडी'चे अन्य घटक पक्ष या यात्रेत त्यांच्यासोबत क्वचितच दिसतात. आता तेजस्वी यादवसाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुका म्हणजे त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असल्याने सगळे डावपेच लढवत ते राहुलसोबत रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचे आश्वासन देताना आपलीही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तेजस्वी यादव यांनी काहीही करायचे बाकी ठेवले नाही. ‘राहुल एके राहुल’चाच पाढा सगळीकडे घोकत त्यांच्या तोंडून आपण बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे कसे दावेदार आहोत, हेच जाहीर होणे त्यांना अपेक्षित होते. पण राहुल गांधी भलतेच धूर्त निघाले. पत्रकारांनी खोदून खोदून त्याबाबत विचारल्यानंतरही राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांचे नाव घेण्याचे टाळले. मात्र, इंडी आघाडी योग्य दिशेने चालली आहे, असे सांगायला ते विसरले नाहीत. 

बिहारात हे 'दो लडके' सध्या धुमाकूळ घालत आहेत हे खरे असले तरी मतदार याद्यांतून मतदारांची नावे गाळली जात आहेत, या त्यांच्या आरोपांची सत्यता पटवण्यासाठी जे पुरावे सादर करणे आवश्यक होते त्या आघाडीवर ते काहीच करू शकले नाहीत. तेजस्वी यादव यांचा या यात्रेसाठी अजेंडा सध्या तरी वेगळाच दिसतो. राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते काँग्रेसचा झेंडा घेऊन राहुल गांधी यांच्याबरोबरीने यात्रेत सहभागी होत असल्याचे वेगळेच चित्र तेथे दिसत आहे. बिहारात राजद आणि काँग्रेस यांचा जनाधार तसा अगदी कमीच आहे, अशा परिस्थितीत सत्तारूढ आघाडीशी स्पर्धा करताना लोकांमध्ये केवळ भ्रम पसरवण्याने काही हाती लागेल, अशा भ्रमात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव ही दुकली रममाण होऊन पुढे जात असेल, तर त्यांच्या पदरी निराशाच येण्याची अधिक शक्यता दिसते. राहुल गांधी यांच्याकडे इंडी आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणीही पहात नाहीत. खुद्द काँग्रेस पक्षातही राहुल गांधींवर एकमत असेल काय याची शंका आहे, पण तेजस्वी यादव यांना मात्र त्यांच्यात देशाच्या पंतप्रधानाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. आता तो का दिसू लागला आहे, हेही स्पष्ट आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आपणच असल्याचे राहुल गांधी यांच्या मनावर बिंबवण्यासाठीच तर तेजस्वी यादव यांनी तो बाण सोडला होता, पण तो बोथट ठरला.

तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर काँग्रेस पक्षाचे अन्य नेतेही पूर्ण मौन बाळगून आहेत, यातूनच विरोधी आघाडीत असलेले मतभेद चव्हाट्यावर येतात. आपल्या दाव्यावर आघाडीत सहमती घडवून आणण्याचा तेजस्वी यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही, याचे एक कारण असेही असू शकते की त्यांनी कोणाही घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा न करता राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर 'बसवण्या'चे धाडस केले. राहुल गांधी हे तर निवडणूक आयोगाला मतचोर ठरवण्यात त्यांनी जी घाई केली त्यामुळे अधिकच कोंडीत सापडले आहेत. सीएसडीएस म्हणजे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीचे प्रो. संजय कुमार यांनी कुठे तरी लिहिलेल्या एका लेखाचा आधार घेऊन राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला ‘मतचोर’ ठरवण्याची जी घाई केली, ती त्यांना बरीच नडेल अशी चिन्हे सध्या दिसत आहेत. संजय कुमार यांनी आपली चूक तर मान्य करून आयोगाची क्षमाही मागितली आहे, अशा परिस्थितीत राहुल गांधी यांचीच री ओढत निवडणूक आयोगाच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या अन्य नेत्यांचीही पंचाईत झाली आहे. राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र दिल्यास ते पुरते कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतील, त्यामुळे विरोधकांचा पुढील मार्ग अधिकच बिकट होऊ शकेल. बिहारात बांगलादेश - नेपाळच्या सीमेवरील मुस्लिमबहुल मतदारसंघांतून प्रामुख्याने यात्रा नेण्याचा इरादाही स्पष्ट दिसतो. घुसखोरांनी मतदार याद्यात मिळलेली जागा कायम राहील, अशी आशा बाळगण्यासारखीही आता परिस्थिती नाही. निवडणूक आयोग तर ठाम आहे आणि अशा परिस्थितीत मताधिकार यात्रेचा बॅन्ड वाजणेच तेवढे बाकी दिसते. एकच निष्कर्ष काढणे आता शक्य आहे तो म्हणजे, राहुल आणि तेजस्वी या दोघांनाही, जे अपेक्षित आहे त्यासाठी अजून बराच काळ थांबावे लागेल.


- वामन प्रभू

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९