फ्रान्सने वसाहतकालीन तीन कवट्या नुकत्याच मादागास्करला परत केल्या आहेत, ज्यापैकी एक कवटी मालागासी राजा टोएरा यांची मानली जाते. १८९७ मध्ये फ्रान्सने राजा टोएरा यांचा शिरच्छेद केला होता. त्यावेळी त्यांची कवटी 'ट्रॉफी' म्हणून पॅरिसला नेण्यात आली आणि राष्ट्रीय इतिहास संग्रहालयात ठेवण्यात आली होती. इतर दोन कवट्या सकालवा वांशिक गटाच्या आहेत.
या कवट्या परत करण्याचा निर्णय २०२३ मध्ये फ्रान्समध्ये मंजूर झालेल्या एका नवीन कायद्यामुळे शक्य झाला. या कायद्यानुसार, मानवी अवशेष त्यांच्या मूळ देशांना परत करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. फ्रान्सच्या संस्कृती मंत्री रचिदा दाती यांनी या घटनेला "वसाहतवादी हिंसाचाराचे आणि मानवी प्रतिष्ठेच्या विरोधातील कृत्य" असे म्हटले आहे. मादागास्करच्या संस्कृती मंत्री वोलामिरांती डोना मारा यांनी याला दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये 'नवीन युगाची सुरुवात' असे वर्णन केले आहे.
सध्या, वैज्ञानिक तपासणीने पुष्टी केली आहे की या कवट्या सकालवा समुदायाच्या आहेत, परंतु यापैकी कोणतीही कवटी खरोखर राजा टोएराची आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही.
२०१७ मध्ये सत्तेत आल्यापासून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आफ्रिकेतील फ्रान्सच्या वसाहतवादी अत्याचारांना मान्यता देण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात त्यांनी मादागास्करची राजधानी अँटनानारिव्हो येथे भेट दिली, तेव्हा त्यांनी फ्रान्सच्या अत्याचारांबद्दल माफी मागितली. १९६० मध्ये मादागास्कर फ्रान्सच्या वसाहतवादी राजवटीतून स्वतंत्र झाला.
अलीकडच्या काळात, फ्रान्स आपला वसाहतवादी भूतकाळ स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे आणि साम्राज्यवादी काळात लुटलेल्या वस्तू व मानवी अवशेष परत करत आहे. पूर्वी यासाठी प्रत्येक बाबतीत संसदेला स्वतंत्र कायदा करावा लागत होता, ज्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. २००२ मध्ये, दक्षिण आफ्रिकेने 'हॉटेंटॉट व्हीनस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका महिलेचे अवशेष परत मागितले होते. ती महिला १९ व्या शतकात युरोपमध्ये 'मानवी तमाशा' म्हणून प्रदर्शित केली गेली होती. नवीन कायद्यांमुळे आता अशा परताव्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.
२०२३ मध्ये फ्रान्सने आणखी एक कायदा मंजूर केला आहे, ज्यामुळे नाझींनी चोरलेल्या ज्यू कलाकृती त्यांच्या मूळ मालकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना परत करता येतील. फ्रान्समधील 'मुसी दे लहोमे' संग्रहालयात ३० हजारांहून अधिक कवट्या आणि सांगाडे आहेत, जे फ्रान्सच्या राजवटीखालील देशांमधून आणले गेले होते.
- सुदेश दळवी