समस्त गोमंतकीय ज्याची आतुरतेने वाट पहात होते, तो लाडका ‘बाप्पा’ घरोघरी विराजमान झाला आहे. गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव आहे. गजानन हे समस्त हिंदूंचे आराध्य दैवत. अलिकडे सर्वच उत्सवांमध्ये काही लोक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा अतिरेक करत आहेत. उत्सवांना व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिणामस्वरूप उत्सवातून धार्मिकता कमी होऊ लागली आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र यासारख्या सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या उत्सवांत हे प्रकार मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत. उत्सवांचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी धर्मसंमत गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे.
आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्यांना ‘चातुर्मास’ म्हटले जाते. या काळात देव विश्रांती घेत असतात. त्यामुळे या काळात भक्तीभाव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सणांचे प्रयोजन करण्यात आले आहे. याच काळात सणांनी भरलेला श्रावण, गणेशाच्या आराधनेत तल्लीन व्हायला लावणारा भाद्रपद, देवीची उपासना मनोभावे करून घेणारा आश्विन आणि दीपावलीचा कार्तिक महिना येतो. सण, उत्सवांतून देवाच्या भक्तीत डुंबून जाणे अभिप्रेत असते; पण अलिकडे उत्सवांना बीभत्स स्वरूप येऊ लागले आहे.धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार, गणेशोत्सवात घरोघरी आणली जाणारी श्री गणेशमूर्ती शाडू किंवा चिकणमातीची, नैसर्गिक रंगाने रंगविलेली आणि दीड ते पाच फूट उंचीची असावी. गणपती अथर्वशीर्षात श्री गणेशाचे वर्णन दिले आहे. त्याप्रमाणे श्री गणेशाची मूर्ती असावी. अलिकडे क्रिकेटपटू, फुटबॉलपटू, शेतकरी, सैनिक, वैमानिक यांच्या वेशात श्री गणेशाची मूर्ती साकारल्याचे पहायला मिळते. कलाकाराची कला कौतुकास पात्र असली, तरी ती मूर्ती अशास्त्रीय ठरते. धर्मशास्त्रानुसार मूर्ती असेल तर वाहत्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर प्रदूषणाचाही प्रश्न उद्भवत नाही. आपल्या धर्मवेत्त्यांनी हजारो वर्षांपूर्वी किती बारीक आणि सखोल अभ्यास केला आहे, हे यावरून लक्षात येते.
गणेशोत्सवात भजन, कीर्तन, प्रवचन, भक्तीसंगीत यासारखे भाव-भक्ती वाढवणारे कार्यक्रम असावेत. आरती आर्ततेने केली जावी. उत्सवाच्या काळात अथर्वशीर्षाचे पठण, नामजप आदी भक्ती वाढवणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. मूर्ती विसर्जनासाठी नेताना फटाक्यांची आतषबाजी किंवा कर्णकर्कश संगीत टाळावे. याऐवजी मिरवणुकीत गणरायाचा जयजयकार, टाळाच्या तालावर भजन यांचा समावेश करावा. धर्मशास्त्रानुसार मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे. त्यामुळे पूजा-अर्चामुळे मूर्तीत आलेली श्री गणेशाची पवित्रके सर्वदूर पोहोचायला मदत होते. प्रदूषण टाळण्यासाठी हौदात, काहिलीत मूर्तीचे विसर्जन करणे योग्य वाटत असले तरी धर्मशास्त्रदृष्ट्या ते अयोग्य ठरते. लक्षात घ्या! गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव आहे. धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार उत्सवातील प्रत्येक कृती केल्यास भाव-भक्ती वाढून उत्सवाचा मूळ हेतू साध्य होईल. शास्त्रसंमत आचरण केल्यानेच श्री गणरायाची कृपा प्राप्त होईल, हे निश्चित!
- प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)