भविष्यात वीज टंचाई टाळण्यासाठी एनटीपीसीसोबत करार

सिपत-३ वीजनिर्मिती प्रकल्पातून गोव्याला मिळणार वीज


18 hours ago
भविष्यात वीज टंचाई टाळण्यासाठी एनटीपीसीसोबत करार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेऊन वीज खात्याने नॅशनल थर्मल पाॅवर कॉर्पोरेशनसोबत (एनटीपीसी) वीज खरेदीचा करार केला आहे. गोव्याला मिळणाऱ्या विजेचे प्रमाण निश्चित झाले नसले तरी तरी विजेची टंचाई निर्माण झाल्यास ती दूर करण्यासाठी आवश्यक तेवढी वीज मिळण्याची तरतूद करारात आहे. वीज खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
राज्याचे मुख्य वीज अभियंते स्टीफन फर्नांडिस आणि एनटीपीसीचे सरव्यवस्थापक पी. आर. जेना यांच्यात हा करार झाला. बिलासपूर (छत्तीसगड) येथे एनटीपीसीने सिपत-३ येथे वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. एनटीपीसीकडून गोव्याला आधीपासूनच वीज मिळत आहे. आता सिपत-३ या वीजनिर्मिती प्रकल्पातूनही गोव्याला वीज मिळणार आहे. ही वीज लगेच मिळणार नाही. २०२८-२०२९ पासून वीज मिळणे सुरू होईल. भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन वीज खरेदीचे करार आधीच करावे लागतात. त्यामुळे हा करार झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
राज्यात सध्या तरी विजेची टंचाई नाही. मात्र मे महिन्यात एसीचा वापर वाढतो. ‘पीक अवर’वेळी उद्योगांना वीज देण्यावर काही वेळा मर्यादा येते. या मर्यादा दूर व्हाव्यात यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीज खरेदी करारासह विजेचा दर्जा वाढवण्यासाठी नवे ट्रान्स्फॉर्मर, तसेच वाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे.
स्वस्तात वीज मिळण्यासाठी करार
राज्याला सध्या ८५० मेगावॅट विजेची गरज आहे. औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी तीन ते चार वर्षांनी ‘पीक अवर्स’वेळी विजेची कमतरता भासू शकते. ५० मेगावॅटपर्यंत कमतरता भासल्यास तेवढी वीज एनटीपीसीच्या सिपत-३ वीजनिर्मिती प्रकल्पातून मिळणार आहे. विजेचा दर सध्या ८ ते ९ रुपये प्रतियुनिट असा आहे; परंतु एनटीपीसीकडून ३.५० रुपये प्रतियुनिट या दराने वीज मिळणार आहे. स्वस्तात वीज मिळण्यासाठी हा करार केला आहे.

हेही वाचा