अंजुणे धरणात ६६ टक्के पाणीसाठा

राज्यात २४ तासांत सरासरी १.९२ इंच पाऊस


17 hours ago
अंजुणे धरणात ६६ टक्के पाणीसाठा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात मागील काही दिवसांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अंजुणे धरणातील पाणीसाठयात वाढ होत आहे. मागील ११ दिवसांत अंजुणे धरणातील पाणीसाठयात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुधवार अखेरीस अंजुणे धरणात ६६ टक्के पाणीसाठा होता. चापोलीत ९५ टक्के, साळावली ११३ टक्के, पंचवाडीत १०१ टक्के, तर गवाणेमध्ये १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
बुधवारी राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. बहुतेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. हवामान खात्याने राज्यात १९ ते २१ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार, या तीन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. १७, १८ आणि २२ जुलै दरम्यान किरकोळ पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात २४ तासांत सरासरी १.९२ इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, केपेमध्ये सर्वाधिक ४.३३ इंच पावसाची नोंद झाली.
राज्यात १ जून ते १६ जुलै दरम्यान सरासरी ५६.८८ इंच पावसाची नोंद झाली. यंदा पावसाचे प्रमाण १.३ टक्क्यांनी कमी आहे. बुधवारी पणजीमध्ये कमाल २९.६ अंश सेल्सिअस, तर किमान २४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान २९.३ अंश, तर किमान तापमान २५.२ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.
धारबांदोडामध्ये आतापर्यंत सर्वाधिक ८५ इंच पाऊस
राज्यात १ जून ते १६ जुलै दरम्यान धारबांदोडामध्ये सर्वाधिक ८५ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे ७३.३६ इंच, केपेमध्ये ६७.९५ इंच, तर फोंडा येथे ६४.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे.