चिखली, फातोर्डा परिसरात दोघांना लुटले
मडगाव। वास्को : दक्षिण गोव्यातील चिखली व फातोर्डा परिसरात पोलीस असल्याचे भासवून अज्ञाताकडून दोघांकडील सोन्याचे दागिने लुबाडण्यात आले. संशयितांनी अनुसिया विश्र्वनारायण (७५, रा. चिखली) यांची १.८० लाखांची चेन व बांगड्या तसेच फातोर्डा येथील सदा नाईक तारी यांची ६० हजारांची अंगठी चोरी केली. दोन्ही प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दक्षिण गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही घटना १५ जुलै रोजी घडल्या. चंद्रावाडा फातोर्डा येथे ज्युपिटर दुचाकीवरुन जाणार्या सदा नाईक तारी यांना संशयिताकडून थांबवण्यात आले. आपण सीआयडी पोलीस अधिकारी असून सोन्याचे दागिने घालून फिरणे धोकादायक असल्याचे सांगत हातातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी कागदात ठेवण्यास सांगितले व कागद गुंडाळून त्यांच्या हातात दिला. यानंतर घटनास्थळावरुन ते पसार झाले. तारी यांनी कागद उघडून पाहिला असता कागदात काहीच आढळले नाही. आपण फसवले गेल्याचे नाईक तारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील तपास करीत आहेत.
दरम्यान, दुसर्या एका घटनेत, चिखली वास्को येथील विद्यामंदिर शाळेनजीक आपण पोलीस असल्याचे सांगत अज्ञातांकडून अनुसिया विश्र्वनारायण (रा. चिखली) यांना फसविण्यात आले. सोन्याचे दागिने घालणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही, असे सांगत सोन्याच्या बांगड्या व सोन्याची चेन काढून देण्यास सांगितले व ते दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. वास्को पोलीस उपनिरीक्षक प्रिस्ली कार्व्हालो तपास करीत आहेत.
सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याने याप्रकरणी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. चोरटे एकटे चालणाऱ्या वृद्ध व्यक्तींना लक्ष्य करतात. वैध ओळखपत्राशिवाय पोलीस असल्याचा दावा करणाऱ्या कोणावरही विश्र्वास ठेवू नका. काही शंका असल्यास, संशय आल्यास जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधा किंवा १००, ११२ क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.