महिला गुंतवणूकदारांच्या टक्केवारीत वाढ : पाच महिन्यांत १,३०० कोटींची वाढ
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील काही महिन्यांत राज्यासह संपूर्ण देशात शेअर बाजारातील गुंतवणूक कमी झाली होती. मात्र फेब्रुवारीनंतर गुंतवणुकीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागील पाच महिन्यांत गोमंतकीयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत गोव्यातून म्युच्युअल फंडमध्ये ३६ हजार ३०० कोटी रुपये गुंतवण्यात आले होते. जून २०२५ अखेरीस त्यात १,३०० कोटी रुपयांची वाढ होऊन ती ३९ हजार ९०० कोटी रुपये झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) या संस्थेच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
अहवालानुसार, गोव्यातील म्युच्युअल फंडमधील प्रतिव्यक्ती गुंतवणुकीतदेखील वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२५ अखेरीस गोव्यात प्रतिव्यक्ती २ लाख ३३ हजार ९० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात आले होते. जून २०२५ अखेरीस त्यात वाढ होऊन ती प्रतिव्यक्ती २ लाख ५६ हजार १७० रुपये झाली आहे. गोव्यातील प्रतिव्यक्ती गुंतवणूक ही देशात सर्वाधिक आहे. या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. येथून प्रतिव्यक्ती २ लाख ४४ हजार ११० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले गेले आहेत. केंद्र शासित प्रदेशांत दिल्ली येथील प्रतिव्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक २ लाख ९५ हजार ८४० रुपये इतकी आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मे २०२५ अखेरीस राज्यातील महिला गुंतवणूकदारांच्या टक्केवारीत पुन्हा वाढ झाली आहे. गोव्यातील शेअर बाजारातील एकूण गुंतवणूकदारांपैकी ३२.६ टक्के गुंतवणूकदार महिला होत्या. महिला गुंतवणूकदारांची राष्ट्रीय सरासरी २४.४ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यातील महिला गुंतवणूकदारांची टक्केवारी ३०.२ होती. गोव्यानंतर सिक्कीम, मिझोरम या राज्यांतदेखील महिला गुंतवणूकदारांची टक्केवारी अधिक आहे.
गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०२४ अखेरीस गोव्यातील २.३३ लाख लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. मे २०२५ मध्ये ती वाढून २.५४ लाख इतकी झाली आहे. मे अखेरीस देशभरातील ११.४९ कोटी लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती.