मामलेदारांनी बोलावूनही पोलिसांची रेती उपसाकडे पाठ

अवैध रेती उपसा उच्च न्यायालयाकडून उगवेतील घटनेची गंभीर दखल


17 hours ago
मामलेदारांनी बोलावूनही पोलिसांची रेती उपसाकडे पाठ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उगवे-तेरेखोल येथे बेकायदा रेती उपसा सुुरू असल्याची तक्रार येताच मामलेदार रात्री १२.३० वा. घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना संरक्षणासाठी चार-पाच वेळा फोन केला; मात्र पोलीस सकाळपर्यंत तेथे पोहोचलेच नाहीत. या घटनेची गंभीर दखल घेऊन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने छापासत्राविषयीची यंत्रणा आणि व्यवस्था याबाबत सरकारकडून अहवाल मागवला आहे. अवमान याचिकेची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
राज्यात बेकायदा रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयाने वरचेवर आदेेश दिले आहेत. महसूल, पोलीस आणि खाण खाते यांनी समन्वय राखून कारवाई केली पाहिजे. या तिन्ही खात्यांमध्ये समन्वय आहे, असे या घटनांवरून दिसत नाही. बेकायदा रेती उपशावर कारवाई करण्याविषयी पोलीस, खाण आणि महसूल खाते यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. समन्वय साधण्यासह बेकायदा रेती उपशावर कारवाई करण्यासाठी सध्या कोणत्या प्रकारची यंत्रणा आहे, यावर सरकारने अहवाल सादर करावा. उच्च न्यायालयाने याविषयी अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर्स नेटवर्क यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायाधीश भारती डांगरे आणि निवेदिता मेहता यांनी हा आदेश दिला. अवमान याचिकेवर १२ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
राज्यात बेकायदा रेती उपशावर कारवाई करण्याबाबत मुंबय उच्च न्यायालयाने ३ एप्रिल २०२५ रोजी आदेश दिला होता. या आदेशाची अपेक्षित अशी कार्यवाही झालेली नाही, असा दावा करून उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली आहे. या अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी हा आदेश जारी केला. याचिकादाराच्या वकिलांनी ७ एप्रिल २०२५ रोजी उगवे-तेरेखोल येथे घडलेला प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणला. यापूर्वी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पेडणे मामलेदारांनी पोलिसांना पत्र लिहून केरी, उगवे येथे पोलीस गस्त ठेवून बेकायदा रेती उपशावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली होती. तरीही बेकायदा रेती उपशाचे प्रकार सुरूच असल्याचे याचिकादाराच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
खांडेपार-फोंडा येथे मांडवी नदीत बेकायदा रेती उपसा सुरू आहे. त्यामुळे नदीचे काठ कोसळत आहेत. तसेच उगवे - तेरेखोल येथेही बेकायदा रेती उपशामुळे शेत जमीन कमी होत आहे, असा दावा अवमान याचिकेतून करण्यात आला आहे.
७ एप्रिल २०२५ रोजी उगवे येथे काय घडले ?
तेरेखोल नदीत रात्री उगवे येथे २५ ते ३० होड्यांद्वारे बेकायदा रेती उपसा सुरू होता.
एका व्यक्तीने याबाबत मामलेदारांकडे तक्रार केली.
पेडणे मामलेदार आणि तक्रारदार घटनास्थळी पोहोचले. तेथे होड्या आणि रेती होती.
रात्री तेथूनच मामलेदारांनी संरक्षणासाठी पोलिसांना बरेच फोन केले.
दुसरे दिवशी सकाळपर्यंत पोलीस घटनास्थळी आलेच नाहीत.
नंतर तेथील होड्याही तेथून गायब झाल्या.
पेडणे मामलेदारानी ८ एप्रिल २०२५ रोजी तेरेखोल पोलीस निरीक्षकांना पत्र लिहिले.