राय प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक
मडगाव : फातोर्डा व चिखली येथील ज्येष्ठ नागरिकांना तोतया पोलिसांकडून लुबाडण्याच्या प्रकरणांत अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, यापूर्वीच्या राय येथील चेन चोरी प्रकरणात इराणी टोळीतील सदस्याला पुणे (Pune) येथून अटक केली आहे. त्याच्याकडून आणखी माहिती घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस (Goa Police) अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी मडगाव येथे पत्रकार परिषद घेत ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणारी टोळी सक्रिय असून त्याच्यापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
'असा' घडला होता प्रकार
तोतया पोलिसांकडून लुबाडण्याच्या प्रकराबाबत पोलीस अधीक्षक असे म्हणाले की, फातोर्डा व चिखली वास्को येथे दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना गाठून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार झाला. संशयितांनी यासाठी काळ्या रंगाची दुचाकी वापरली होती. चालकाने हेल्मेट परिधान केले होते. 'सोन्याचे दागिने परिधान करणे धोकादायक असल्याचे सांगत संशयितांनी त्या ज्येष्ठांकडचे दागिने काढून आपल्याकडील कागदात गुंडाळून दिले. मात्र ते निघून गेल्यावर त्यांनी दिलेल्या कागदात दागिने नसल्याचे त्या ज्येष्ठ व्यक्तींच्या लक्षात आले.
अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधाः अधीक्षक
या दोन्ही घटनांत संशयितांनी ७० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे याबाबत ज्येष्ठांना काळजी घ्यावी. पोलिसांना काही चुकीचे वाटल्यास एखाद्यावेळी ते सल्ला देतील पण नागरिकांकडून कोणतीही वस्तू घेणार नाहीत. असा प्रकार घडल्यास ११२ किंवा १०० क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राय येथील चोरीप्रकरणी इराणी टोळीतील एकाला अटक
गेल्यावर्षीही अशाप्रकारेच ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडले होतेेे. त्यातील एका प्रकरणात पुण्यातील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक ठाण्यात एकटे राहणार्या ज्येष्ठ नागरिकांची लिस्ट असून त्याच्या घरी पोलीस भेट देत असतात, पण कुटुंबासह राहणार्या ज्येष्ठांची नोंदणी पोलिसांकडे नाही. राय येथील सुषमा शिरोडकर यांच्या गळ्यातील चेन चोरीप्रकरणी इराणी टोळीतील संशयित रहिम मिर्झा याला मायना कुडतरी पोलिसांनी जुलै महिन्यातच अटक केली असल्याचे पोलीस अधीक्षक सिंग यांनी सांगितले.