चिंचणीत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न

चोरांना पकडण्यास गेलेल्या पंचावर हेल्मेटने हल्ला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th July, 04:14 pm
चिंचणीत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न

मडगाव : दुर्गा चिंचणी येथील आजूबाजूला लोकवस्तीतील एक बंद घरफोडण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी घडला. शेजार्‍यांनी विचारणा केल्यानंतर पळून जाणार्‍या दोघा चोरांना पंच जेरसन गोम्स यांनी पकडले असता, चोरट्यांनी त्यांच्या हेल्मेटने हल्ला करत पळ काढला. कुंकळ्ळी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

 
दुर्गा चिंचणी परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. दोन अनोळखी व्यक्ती बंद घरात येताना दिसल्याने शेजारील घरात राहणार्‍या महिलेने त्यांना विचारणा केली असता, त्यांनी संरक्षक भिंतीवरून उड्या मारल्या. सदर महिलेने ही बाब पंच जेरसन गोम्स यांना सांगितली असता त्यांनी आपल्यासोबत आणखी एकाला घेत घटनास्थळी धाव घेतली. 

जेरसन यांना साधारणत १२ वर्षीय मुलासोबत एक व्यक्ती बजाज पल्सर गाडी ढकलत नेताना दिसली. जेरसन गोम्स यांनी गाडीसह मुलाला पकडले असता दुसर्‍या व्यक्तीने जेरसन यांना जोरात धक्का दिला व त्या मुलाने हातातील हेल्मेटचा जोरदार प्रहार जेरसन याच्या डोक्यावर केला. यात जेरसन बेशुध्द पडले. 

दरम्यान नजीकच काम करणार्‍या एका कामगाराने त्यांच्या दिशेने धाव घेताच संशयित चोर घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळाल्यावर कुंकळ्ळी पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. जेरसन यांच्यासोबत झालेल्या झटापटीत चोरट्यांचे घटनास्थळीवर पडलेले हेल्मेट सापडले असून गावातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दोन्ही संशयित चोर कैद झाले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा