पोर्नोग्राफीत गुंतल्याची​ भीती दाखवून ६४ वर्षीय महिलेला १.५२ कोटींचा गंडा

‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार : अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
4 hours ago
पोर्नोग्राफीत गुंतल्याची​ भीती दाखवून ६४ वर्षीय महिलेला १.५२ कोटींचा गंडा

पणजी : पोर्नोग्राफी आणि मानवी तस्करीशी निगडित समावेश असल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली बार्देश तालुक्यातील ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेला १.५२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सायबर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बार्देश तालुक्यातील ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने ११ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, शुक्रवार १६ मे २०२५ रोजी कर्नाटकातील केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने तिला वॉट्सअॅप काॅल केला. त्याने तिचा आधार कार्डचा वापर करून मुंबई येथील कॅनरा बँकेत खाते उघडल्याची माहिती दिली. तसेच संबंधित खाते सुधाकर खान नामक व्यक्तीचे असल्याचे सांगितले. तसेच बँक खाते पोर्नोग्राफी आणि मानवी तस्करीशी निगडित प्रकरणाशी सहभागी असल्याचे सांगितले. तिला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली. हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यात १ कोटी ५२ लाख ५७ हजार १९६ रुपये जमा करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल क्रमांकधारका विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

हेही वाचा