जप्त केलेल्या चिकनची विल्हेवाट उघड्यावर

नागवात एफडीएकडून ३०० किलो चिकन नष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
जप्त केलेल्या चिकनची विल्हेवाट उघड्यावर

म्हापसा : नागवा- हडफडे येथील चिकन वितरक आस्थापनातील गलिच्छ स्थितीमधील ३०० किलो चिकन अन्न व औषधे प्रशासनाने जप्त केले. नंतर या चिकनची आस्थापना शेजारीलच नाल्यामध्ये उघड्यावर विल्हेवाट लावण्यात आली. हॉटेल आणि रेस्टॉरन्टना पुरवठा करण्यासाठी हे चिकन हुबळीहून आणण्यात आले होते.

गुरुवारी १७ रोजी सकाळी एफडीएच्या पथकाने साश्वथ यादव यांच्या मालकीच्या या चिकन वितरक आस्थापनावर छापा टाकला. पाहणीवेळी अस्वच्छ व गलिच्छ अशा जागी हे चिकन साठवून ठेवण्यात आले होते.

शिवाय चिकनचा पुरवठा हुबळीहून आणला गेला आहे, याबाबतची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे संबंधित आस्थापनाच्या मालकाकडे नव्हती. त्यामुळे हे सर्व चिकन पंचनाम्यानंतर जप्त करण्यात आले. नंतर हे चिकन नाल्यामध्ये उघड्या जागी नष्ट करण्यात आले. विल्हेवाट लावलेल्या या चिकनची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे.

दरम्यान, मिठाईमध्ये घातक रंग घातला गेल्याच्या तपासणी मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कळंगुट मधील मेसर्स शिवलैरी इंटरप्रायझेसमध्ये छापा टाकला. बोरी फोंडा येथील मंथन नामक ब्रँण्डचा अतिरिक्त रंगासह चुकीच्या उत्पादनाच्या मिठाईचा पुरवठा केला जात होता. ही जवळपास ५० हजार रूपये किमतीची मिठाई जप्त करीत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी नमुने विश्लेषणासाठी पाठवली आहे.

एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, लेनिन डिसा, नौसिन मुल्ला व अमित मांद्रेकर या पथकाने ही कामगिरी केली.

जप्त केलेला चिकनचा साठा खुल्या जागी तो देखील नाल्यामध्ये विल्हेवाट लावण्याच्या एफडीएच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील कार्यपद्धतीवर नागवा-हडफडेतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा