दर महिन्याला सरासरी ३ खून, ११ बलात्कारांचे गुन्हे नोंद

८५.९२ टक्के गुन्ह्यांचा तपास यशस्वी, मात्र चोरीचे प्रमाण चिंता वाढविणारे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
दर महिन्याला सरासरी ३ खून, ११ बलात्कारांचे गुन्हे नोंद

पणजी : राज्यात १ जानेवारी ते १३ जुलै २०२५ या कालावधीत नोंद झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता, दर महिन्याला ३ खून तर ११ बलात्कारांचे गुन्हे नोंद झाले आहेत. याशिवाय राज्यातील गुन्हेगारीची टक्केवारी पाहिल्यास गंभीर गुन्ह्यात ९७.३४ टक्के तर भा. न्या. संहितेच्या विविध कलमाअंतर्गत दाखल केलेल्या एकूण गुन्ह्यांचा ८५.९२ टक्के तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, चोरीच्या तपासामुळे ही आकडेवारी नेहमीच कमी राहते. त्यामुळे पोलिसांनी यावर जास्त भर देणे आवश्यक आहे.

राज्यात वरील कालावधीत भा. दं.संहितेच्या (आयपीसी) तसेच भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमाअंतर्गत १,१६५ गुन्हे दाखल झाले. त्यातील १,००१ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. यशस्वी तपासाची ही टक्केवारी ८५.९२ टक्के आहे.

एक दरोडा, दोन बलात्कारांचे संशयित फरार

राज्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा पोलीस मिळून १८ खून तर ६९ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामुळे दर महिन्याला ३ खून तर ११ बलात्कारांचे गुन्हे नोंद होत आहेत. याशिवाय प्राणघातक हल्ला १७, सदोष मनुष्यवध ६, ३ दरोडे मिळून ११३ गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. यातील एक दरोडा आणि दोन बलात्कारांचे संशयित अजून पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे ही टक्केवारी ९७.३४ एवढी आहे.

चोऱ्यांचा तपास फक्त ५८.७३ टक्के 

जबरी चोरी, घरफोड्या, सोनसाखळी, मोबाईल व वाहनांची चोरी तसेच इतर चोऱ्या मिळून २६९ गुन्हे दाखल झाले. यातील फक्त १५८ (५८.७३ टक्के) चोऱ्यांचा यशस्वी तपास लागला. त्यात ६ जबरी चोऱ्यांची नोंद झाली असून एका चोरीचा तपास लावण्यात अपयश आले आहे. ४१ घरे फोडण्यात आली, त्यातील २२ प्रकरणांचा छडा लागला. ११ सोनसाखळ्या चोरण्यात आल्या, त्यातील फक्त ४ प्रकरणांचा छडा लागला. शिवाय वाहन चोरी आणि इतर प्रकारच्या २११ चोऱ्यांपैकी १२७ प्रकरणांचा छडा लागला. त्यामुळे ही टक्केवारी ५८.७३ एवढी आहे.

१,१६५ गुन्ह्यांपैकी १,००१ गुन्ह्यांचा तपास

राज्यात वरील कालावधीत फसवणुकीच्या १०० गुन्ह्यांपैकी ९५, विश्वासघात केल्याप्रकरणी १५ गुन्ह्यांपैकी १०, अपहरणाच्या ५० गुन्ह्यांपैकी ४०, मारामारीच्या ९६ गुन्ह्यांपैकी ९५ गुन्ह्यांत संशयितांना अटक करण्यात आली. अपघाती मृत्यूप्रकरणी ११४ गुन्ह्यांपैकी १११, इतर अपघातांच्या १८४ गुन्ह्यांपैकी १८० गुन्ह्यांत संशयितांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय भा.दं.सं.च्या आणि भा. न्या. सं. च्या इतर गुन्हे मिळून १,१६५ गुन्हे दाखल झाले. त्यातील १,००१ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले.

‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणातील संशयित फरार

राज्यात वरील कालावधीत ७९ अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील ७६ जणांना अटक करण्यात आली आहेत. तीन प्रकरणे ‘हिट अॅन्ड’ असून त्यातील संशयित अजून फरार आहे. याशिवाय इतर अपघात प्रकरणी १५५ गुन्हे दाखल असून त्यातील १४२ जणांना अटक करण्यात आली असून १३ जण अजून मोकाट फिरत आहेत. 

हेही वाचा