कला अकादमीचे कोसळलेले सभागृह दुरुस्त न झाल्याने कलाकारांकडून आंदोलन

कला राखण मांडने साजरा केला खुल्या सभागृहाचा स्मृतिदिन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
कला अकादमीचे कोसळलेले सभागृह दुरुस्त न झाल्याने कलाकारांकडून आंदोलन

खुल्या सभागृहाकडे फुले अर्पण करण्यासाठी जाताना कलाकार.

पणजी : गोवा कला अकादमीचे खुले सभागृह कोसळून दोन वर्षांनंतरही दुरुस्त न झाल्यामुळे कला राखण मांड या संघटनेने सरकारविरोधात अनोखे आंदोलन करून निषेध केला. गुरुवारी मंचाच्या सदस्यांनी सभागृहात जाऊन व्यासपीठावर फुले अर्पण केली आणि सरकारला सुबुद्धी देण्यासाठी प्रार्थना केली.
हे आंदोलन कला अकादमी सभागृह कोसळण्याच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. यावेळी कला राखण मांडचे अध्यक्ष देविदास आमोणकर म्हणाले, दोन वर्षे उलटूनही या सभागृहाची दुरुस्ती न होणे हे अत्यंत दु:खद आणि खेदजनक आहे. म्हणूनच आम्ही आज हा स्मृतिदिन साजरा करत आहोत. या व्यासपीठावर एकेकाळी गोवा आणि देशभरातील नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली होती. मात्र, तेच व्यासपीठ मोडकळीला आलेले पाहून मन भरून येते, असे भावनिक उद्गार आमोणकर यांनी व्यक्त केले. या सभागृहासाठी गेल्यावर्षी आम्ही कला अकादमी बाहेर रडलो. पण, सरकारने आमचे दु:ख ऐकले नाही, असा आरोपही त्यांनी केला. पुढील स्मृतिदिन साजरा करण्याची वेळच येऊ नये यासाठी सरकारने एक सुसज्ज नवे सभागृह उभे करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
कला ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. तिच्या संवर्धनासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, हीच आमची अपेक्षा आहे. - देविदास आमोणकर, अध्यक्ष, कला राखण मांड

हेही वाचा