नदी परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती
पणजी : सरकार रो रो फेरीबोटी भाडेतत्वावर चालवणार आहे, मात्र या फेरीसेवेतून मिळणारा महसूल थेट सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे. रो रो फेरीबोट ऑपरेटर कंपनीला सरकार त्यांना येणाऱ्या खर्चाप्रमाणे मासिक भाडे देणार आहे, अशी माहिती नदी परिवहन खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
नदी परिवहन खात्याने चोडण - रायबंदर मार्गावर दोन रो रो फेरीबोटी सुरू केल्या आहेत. विजय मरिन सर्व्हिसेसने या फेरीबोटी बांधल्या आहेत. या दोन्ही फेरीबोटींसाठी २५ कोटी रुपये खर्च आला आहे. हा खर्च सरकारला परवडणारा नसल्याने, या फेरीबोटी पीपीपी तत्वावर चालवल्या जाणार आहेत.
‘बिल्ड अँड ऑपरेट’ तत्वावर विजय मरिन सर्व्हिसेसने स्वतः २५ कोटी रुपये खर्च करून या दोन्ही फेरीबोटी बांधल्या आहेत आणि सरकारने त्यासाठी एकही पैसा खर्च केलेला नही. विजय मरिन सर्व्हिसेस ही कंपनी या दोन्ही फेरीबोटी चालवणार आहे. या फेरीबोटींचे खलाशी आणि कर्मचारी विजय मरिन सर्व्हिसेसचे असणार आहेत. नदी परिवहन खात्याचे कर्मचारी या फेरीबोटींमध्ये असणार नाहीत.
तिकिटांचे शुल्क मात्र नदी परिवहन खातेच गोळा करणार आहे. नदी परिवहन खाते हे शुल्क गोळा करणार आहे, विजय मरिन सर्व्हिसेस करणार नाही. त्यांना महिन्याला जो खर्च येतो, त्यानुसार त्यांना नदी परिवहन खाते प्रत्येक महिन्याला पैसे देणार आहे, अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली.
फेरीसेवा बंद पडल्यास पैसे कापले जाणार!
खात्याचे काम फक्त शुल्क गोळा करणे हे आहे. फेरीबोटींमध्ये इंधन भरणे, देखभाल करणे, काही बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे हा सर्व खर्च विजय मरिन सर्व्हिसेसला करावा लागणार आहे. जर कोणत्याही कारणामुळे रो रो फेरीसेवा बंद पडल्यास आणि त्या दिवशी फेरीबोट प्रवाशांसाठी उपलब्ध न झाल्यास, त्या दिवसाचे पैसे नदी परिवहन खाते कापून घेईल, अशी अट घालून या फेरीबोटी त्या कंपनीला चालवायला दिल्या आहेत, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.