गोवा चित्रपट महोत्सवात चार दिवसांत तीन पर्वांचे चित्रपट प्रसारित होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला तयारीचा आढावा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
16th July, 04:28 pm
गोवा चित्रपट महोत्सवात चार दिवसांत तीन पर्वांचे चित्रपट प्रसारित होणार

पणजी : गोवा चित्रपट महोत्सवाच्या दहाव्या, अकराव्या आणि बाराव्या पर्वांचे चित्रपट यंदा १४ ते १७ ऑगस्ट दरम्यान, अवघ्या चार दिवसांत प्रसारित होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) बैठकीत या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

गोवा चित्रपट महोत्सव दोन वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. मात्र,  २०२० आणि २०२२ मध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर महोत्सव रद्द करण्यात आला होता. तर २०२४ मध्ये काही अन्य कारणांमुळे महोत्सव होऊ शकला नाही. यामुळे यंदा मागील तीन पर्वांचे चित्रपट एकत्रितपणे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

चित्रपट सादरीकरणासाठी चित्रपट निर्मात्यांकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली असून, चित्रपटांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू आहे. गोमंतकीय निर्मात्यांनी तयार केलेले चित्रपट या महोत्सवात प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत. ईएसजीच्या संकेतस्थळावर प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा