पारंपरिक मासेमारी जोरात : बांगडे, सुंगटे, धोडयारे, मोरी जाळ्यात
पणजी : गोव्यात पारंपरिक ‘रापणी’द्वारे मासेमारीला (Rampani net fishing) सुरुवात झाली आहे. सध्या पावसाळी वातावरण असूनही रापणकारांच्या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत आणि त्यांना चांगला दरही मिळत आहे. पारंपरिक मच्छीमार व्यावसायिक पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, आम्हाला या महिन्यातच मासेमारी करणे शक्य होणार आहे, कारण ऑगस्ट महिन्यानंतर मोठ्या ट्रॉलरद्वारे मासेमारी सुरू झाल्यावर आमच्या जाळ्यांमध्ये जास्त मासे सापडत नाहीत.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात मासेमारी बंदी असते. मात्र १ जुलैपासून पारंपरिक मच्छीमारांना समुद्रात ठराविक अंतरावर रापणीद्वारे किंवा गळ लावून मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारी सुरू होईल. यामुळे गेली सुमारे एक महिना खाडीतील किंवा आगरातील मासे खाणाऱ्या गोमंतकीयांना आता समुद्रातील ताज्या माशांचा आस्वाद घेता येणार आहे.
सध्या दक्षिण गोव्यात पारंपरिक मासेमारी सुरू झाली आहे, तर उत्तर गोव्यात फक्त तिसवाडी आणि सिकेरी वगळता इतर किनारी भागांमध्ये पारंपरिक मासेमारी अजून सुरू व्हायची आहे. सध्या रापणीला बांगडे, सुंगटे, धोडयारे आणि मोरी असे मासे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत.
बाणावली येथील पारंपरिक मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, आम्हाला मोठ्या प्रमाणात नसले, तरी चांगले मासे मिळत आहेत. सुंगटे, बांगडे, आणि धोडयारे पुरेसे मिळत आहेत. या माशांना सध्या चांगला दर मिळत आहे. बांगडे १५०० ते २००० रुपये प्रति टोपली, सुंगटे १२०० ते १५०० रुपये प्रति टोपली, मोठी सोलार सुंगटे ३००० रुपये प्रति टोपली, आणि धोडयारे २००० रुपये प्रति टोपली या दराने आम्ही विकत आहोत.
ट्रॉलरमुळे पारंपरिक मच्छीमारांसमोर समस्या
पेले फर्नांडिस यांनी सांगितले की, १ ऑगस्टपासून ट्रॉलर आणि मोठ्या बोटी मासेमारीला सुरुवात करतील, तेव्हा त्यांनाच मोठ्या प्रमाणात मासे मिळतात आणि आम्हाला मिळणाऱ्या माशांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आम्हाला फक्त एकच महिना मासेमारीला मिळतो. मोठमोठे ट्रॉलर एलईडी वापरून मासेमारी करतात आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांच्या ट्रॉलरवर मोठे जनरेटर असतात आणि त्यांची विजेची क्षमता फातोर्डा फुटबॉल स्टेडियमवरील वीजपुरवठ्याएवढी असते. आमच्या जाळ्यांची क्षमता केवळ १०० किलो आहे, तर त्यांच्या जाळ्यांची क्षमता ३ टनांपेक्षा अधिक असते.