फोंडा : सावईवेरे येथे गव्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th July, 04:38 pm
फोंडा : सावईवेरे येथे गव्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

फोंडा : सावईवेरे परिसरात मंगळवारी सकाळी काजूच्या बागेत काम करत असलेल्या दोन शेतकरी बंधूंवर गव्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात धर्मा गिरोडकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा भाऊ दिनू गिरोडकर किरकोळ जखमी झाला आहे. 

ही घटना खामिणी डोंगर परिसरात घडली. गिरोडकर बंधु रोजच्या प्रमाणे आपल्या बागायतीत गेले असता, एका गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळी एकच घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात शेतातील धान्य आणि  चाऱ्याच्या शोधात गवे रेडे आपल्या अधिवासातून बाहेर पडून लोकवस्तीच्या जवळ येत आहेत. 

आमदार गावडे म्हणाले की, अशा घटना रोखण्यासाठी वन विभागाशी तातडीची बैठक घेण्यात येईल. जखमी शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातील. दरम्यान, बागायतीत काम करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा