नागरी वस्तीत संचार : वन खात्याने ठोस उपाययोजना करण्याची मागणी
पेडणे : पेडणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा (Leopard) संचार वाढल्याने भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा धसका घेतल्याने अनेक भागांत लोकांनी रात्रीचा वावर बंद केला आहे. शाळकरी मुले, शेतकरी, महिला आणि वृद्ध यांच्यात बिबट्याविषयी भीतीचे वातावरण दिसून येते. मात्र प्रशासनाकडून या समस्येकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप लोकांकडून होत आहे.
तालुक्यातील मांद्रे, कोरगाव, हरमल, केरी, विर्नोडा आणि मोरजी परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्यांचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. काही ठिकाणी बिबट्यांनी गुरे फस्त केली असून अनेक ठिकाणी कुत्र्यांचा पडशा पाडला आहे. काही गावांत गावकऱ्यांनी गस्त घालणे सुरू केले आहे. स्थिती इतकी गंभीर असतानाही वन विभाग निष्क्रिय असल्याची टीका होत आहे. घटनास्थळी न जाता केवळ फोनवर तक्रारी नोंदवून दुर्लक्ष करणे किंवा बिबट्याचा ठावठिकाणा लागत नाही असे सांगून हात झटकण्याचा अनुभव येत असल्याने लोक हतबल बनले आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी काही गावांत पिंजरे लावण्याची मागणी होत असूनही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
नैसर्गिक अधिवासावर गदा...
वन जमिनींतील अतिक्रमणे, उत्खनन, रहिवासी इमारतींची वाढ यामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. प्राण्यांना अन्न, पाणी आणि निवाऱ्याचा अभाव जाणवत असल्याने ते लोकवस्तीत येतात.त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील संतुलन ढासळले आहे. वनविभाग, जिल्हा प्रशासन, आणि लोकप्रतिनिधींनी या संदर्भात कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
मांद्रेत दिसला ब्लॅक पँथर
२० दिवसांपूर्वी मांद्रे गावात ब्लॅक पँथरने (Black Panther) पाळीव कुत्र्यावर हल्ला चढविला होता. मात्र कुत्रा भुंकल्यामुळे घरातील लोक जागे झाले. त्यांची चाहूल लागताच ब्लॅक पँथर तिथून पसार झाला होता.
पालिका क्षेत्रासह गावांतही वावर
- पेडणे पालिका क्षेत्रात श्री भगवती मंदिर परिसरात १० दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला.
- वारखंड, खाजने-अमेरे-पोरस्कडे या पंचायत क्षेत्रात बिबट्यांचा वावर आहे.
- चोपडे-आगरवाडा चढणीवर आठ दिवसांपूर्वी एका युवकाच्या दुचाकीला बिबट्या धडकला होता.
- आश्वे मांद्रे येथे सीसीटीव्हीत काही दिवसांपूर्वी बिबट्या कैद झाला. सरकारी शाळेच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले.
बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे आम्ही रात्री गस्त घालतो. ज्या भागात वारंवार बिबट्या आढळून येतो, त्या भागात नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पिंजरा बसविला जातो.
- हरीश महाले, पेडणे वनखात्याचे वनक्षेत्रपाल
प्रत्येकाकडून निसर्ग रक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. निसर्ग टिकला तरच वन्यप्राणी जंगलात स्थिरावतील. भविष्यातील अराजकाचा विचार आताच करून जमिनी विकण्याचा सपाटा थांबवायला हवा.
- तुकाराम खर्बे, वनपरीक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, कांपाल-पणजी